Pahalgam Terror Attack: इंडियन आर्मीला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठे यश; लोगडिंग जिल्ह्यात नेमके काय घडले?
इटानगर: पहलगाम हल्ल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. भारतीय लष्कर जम्मू काश्मीरसह अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत आहे. अनेक दहशतवादी लष्कराच्या रडारवर आहेत. दरम्यान त्यातच आता भारतीय लष्कराला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठे यश प्राप्त झाले आहे. अरुणाचल प्रदेशच्या लोगडिंग जिल्ह्यात सैन्य दलाने तीन उग्रवादी ठार मारले आहेत.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कर आणि उग्रवादी यांच्यात मोठी चकमक झाली आहे. यावेळी भारतीय लष्कराने तीन उग्रवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यातच एका अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका देखील केली आहे.
भारतीय लष्कराने ठार मारलेल्या तीन उग्रवाद्यांची ओळख पटली आहे. सर्व उग्रवादी हे नॅशनल सोशलिस्ट ऑफ काऊन्सिल ऑफ नागालँड ग्रुपचे सदस्य आहेत. भारतीय लष्कराकडून या ऑपरेशनची माहिती देण्यात आली. या ऑपरेशनमध्ये इंडियन आर्मी, आसाम रायफल्स आणि जिल्हा पोलिस दल सहभागी झाले होते. पहालगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर आणि सीमावर्ती भागात हे ऑपरेशन राबवले जात आहे.
पहलगाम हल्ल्यात चीनचा सहभाग…?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील गुप्तचर यंत्रणांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून या घटनेचा तपास केला जात आहे. या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेच्या तपासांतर्गत तपास यंत्रणांना चीनच्या एका संशयास्पद सॅटेलाईट फोनचा मागोवा लागला आहे. तपास यंत्रणांना चीनच्या एका ‘हुआवेई सॅटेलाइट फोन’चा तपास लागला आहे. पहलगाम हल्ल्यावेळी हा फोन घटनास्थळावर होता, अशी माहिती समोर आली आहे.
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात चीनचा सहभाग…? तपासात धक्कादायक माहिती उघड
मिळालेल्या माहितीनुसार, हुआवेई ही चीन कंपनी आहे. या कंपनीच्या उपग्रह उत्पादनावर भारतात बंदीही घालण्यात आली आहे. घटनेवेळी हा फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही परदेशी स्त्रोताच्या माध्यमातून भारतात आल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे. २२ एप्रिलला ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी या फोनवरून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी चार वेळा संपर्क साधण्यात आला होता. पण घटनास्थळी मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असल्याने हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला नाही. हल्ल्यापूर्वी आणि त्यादरम्यान किमान १० लोक एन्क्रिप्टेड अॅप्सद्वारे त्यांच्या हँडलरशी गप्पा मारत होते आणि त्यांना कॉल करत होते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
भारताचे आतापर्यंत घेतलेले निर्णय काय?
पहालगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. वाघा बॉर्डर बंड करण्यात आली आहे. तसेच भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना या तीनही सुरक्षा दलांनी ‘आक्रमण’ अंतर्गत युद्धाभ्यास देखील सुरू केला आहे.