
Pune News: भारतीय सैन्याने दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली २८ ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान वाळवंटातील ड्रोन आणि काउंटर-ड्रोन सराव ‘वायू समन्वय-II’ यशस्वीरित्या पार पाडला. भविष्यातील युद्ध परिस्थितीसाठी सैन्याच्या तयारीची चाचणी घेणे आणि हवाई आणि भू-संपत्तीचा एकात्मिक वापर सुनिश्चित करणे हा दोन दिवसांचा सरावाचा उद्देश होता.
‘वायू समन्वय-II’ हा सराव सैनिकांना आधुनिक बहु-डोमेन कमांड आणि नियंत्रण प्रणालींसह प्रत्यक्षात काम करण्याचा व्यावहारिक अनुभव देण्यासाठी रचना करण्यात आला होता. या अभ्यासात आव्हानात्मक इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि वास्तविक-जगातील लढाऊ परिस्थितींचे वास्तवदर्शी सराव करण्यात आला. सरावादरम्यान भारतीय सैन्याने ड्रोन आणि ड्रोनविरोधी (C-UAS) ऑपरेशन्सशी संबंधित तत्त्वे व रणनीती विकसित करून त्यांची चाचणी केली — ज्यामुळे उदयोन्मुख हवाई धोक्यांचा मुकाबला करण्याची क्षमता अधिक बळकट झाली आहे.
वाळवंटातील उष्ण हवामान आणि भूप्रदेशामुळे हा सराव आणखी आव्हानात्मक होता. या युद्ध सरावात, आर्म्ड, इन्फंट्री, तोफखाना आणि सिग्नल कॉर्प्ससारख्या लष्कराच्या विविध शाखांनी संयुक्तपणे भाग घेतला होता. या सरावामार्फत तंत्रज्ञानावर आधारित समन्वित युद्धाचे उत्कृष्ट सादरीकरण दिसून आले. या सरावात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचाही यशस्वी वापर करण्यात आला.
दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी “वायु संवाद-II” सरावाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी अधिकारी व सैनिकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, या सरावातून मिळालेला व्यावहारिक अनुभव भारतीय सैन्याच्या क्षमतावृद्धीला हातभार लावणार असून, ड्रोन आणि काउंटर-ड्रोन प्रणालींच्या जलद समावेशाला गती देईल.
लेफ्टनंट जनरल सेठ यांनी सांगितले की, हा सराव भविष्यातील युद्धसज्जतेच्या गरजा लक्षात घेऊन तांत्रिकदृष्ट्या सक्षम, चपळ आणि आधुनिक सैन्य घडविण्याच्या भारतीय सैन्याच्या दृढ दृष्टिकोनाची पुष्टी करतो. “वायु संवाद-II” केवळ भारतीय सैन्याची धोरणात्मक तयारी अधोरेखित करत नाही, तर उदयोन्मुख धोक्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांची सतर्कता, क्षमता आणि नवोपक्रमावरील बांधिलकीदेखील अधोरेखित करतो.