
Indian Tejas fighter jet crashed:
वृत्तसंस्था पीटीआयने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आज दुपारी २:१० वाजता विमान कोसळले. व्हिडिओमध्ये विमान जमिनीवर कोसळताना दिसत आहे, त्यानंतर आगीचे लोट आणि काळा धुराचे लोट दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतील अल मकतूम विमानतळावर सुरू असलेल्या एअर शोमध्ये डेमो फ्लाइट दरम्यान हा अपघात झाला. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहेे. शुक्रवारी दुबई वेळेनुसार दुपारी २:१० आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ३:४० वाजता हा अपघात झाला. अपघातादरम्यान तेजसचा पायलट बाहेर पडला की नाही हे सध्या स्पष्ट नाही. विमान कोसळताच त्याला आग लागली आणि विमानतळावर धुराचे लोट दिसले.(International News)
दुबई एअर शोमध्ये उड्डाण प्रदर्शनादरम्यान भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळून पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर युएईच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करत या अपघाताची माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे की, “दुबई एअर शोमध्ये उड्डाण प्रदर्शनादरम्यान एक भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळले, ज्यामुळे पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.” (Indian Tejas fighter jet crashed)
तेजस हे सिंगल-इंजिन, पूर्णपणे स्वदेशी विकसित केलेले लढाऊ विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने त्याची निर्मिती केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे विमान दूरवरील लक्ष्य भेदू शकते, तसेच शत्रूच्या रडारपासून बचाव करण्याची क्षमता यात आहे. लढाऊ क्षमतेच्या बाबतीत तेजस हे हलके असले तरी सुखोई सारख्या जड लढाऊ विमानाइतकेच शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे. या दुर्घटनेमुळे एअर शोमध्ये खळबळ उडाली असून अधिकृत तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दुबई एअर शोदरम्यान झालेल्या तेजस लढाऊ विमानाच्या भीषण अपघातात भारतीय वैमानिकाचा मृत्यू झाल्याने देशभरात दुःख व्यक्त केले जात आहे. या दुर्घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त करत प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले, “दुबई एअर शोमध्ये तेजस विमान अपघातात आपल्या शूर भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना. राष्ट्र त्यांच्या धाडसाचा आणि सेवेचा सन्मान करत त्यांच्या सोबत उभे आहे.”
अरविंद केजरीवाल यांनीही एक्सवरील पोस्टद्वारे शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले,“एका शूर हवाई योद्ध्याच्या निधनाने देश शोकात बुडाला आहे. शोकग्रस्त कुटुंबाप्रती आमच्या तीव्र संवेदना. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी त्वरित आणि सखोल चौकशी आवश्यक आहे. आमच्या वैमानिकांची सुरक्षा आणि त्यांचे जीवन अत्यंत महत्त्वाचे आहे.” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.