नवी दिल्ली – चाय सुट्टा बार (Chai Sutta Bar) असं नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहील. पण प्रत्यक्षात असं काही नाहीये. ना इथं बार आहे, ना इथं मद्य देण्यात येतं. या दुकानात सिगारेटही मिळत नाही. हे फक्त एक चहाचं दुकान आहे. जितकं भारी या दुकानाचं नाव आहे, तितकाच या दुकानाच्या जन्माचा इतिहासही भारी आहे. ज्या वयात मुलं एकत्र येऊन क्रिकेट वगैरे खेळतात, त्या वयात एका तरुणानं आपल्या मित्रांसह एक कंपनी उभी केली, त्यातून हे चहाचं दुकान उभं राहिलंय. 22-23 वर्षांच्या दोन मित्रांनी एक कंपनी सुरु केली. त्या कंपनीचा टर्न ओव्हर आता 150 कोटींच्या घरात आहे.
या दुकानाचा प्रवास 2016 साली सुरु झाला. अनुभव दुबे (Anubhav Dubey) आनंद नायक (Anand Nayak) हे दोघं बालपणीचे मित्र. दोघांची शिक्षण बी कॉमपर्यंतच. दोघंही मध्यप्रदेशआतील इंदूरचे रहिवासी. अनुभवच वडील हे उद्योगपती आहेत. मात्र आपल्या मुलानंही उद्योगपती व्हावं, अशी त्यांची इच्छा नव्हती. यूपीएससी करुन आयएएस अधिकारी व्हावं, अशी अनुभवच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी अनुभवला दिल्लीला पाठवण्यात आलं. सीएच्या परीक्षेत अपयश मिळाल्यानंतर यूपीएससीच्या तयारीसाठी अनुभवही दिल्लीत आला. या काळात नोकरीसाठी नाही तर व्यवसायासाठीच आपण अधिक पात्र आहोत हे अनुभवच्या लक्षात आलं होतं..
व्यवसायच करायचाय हे ठरल्यानंतर अनुभव संधीच्या शोधात होता. नेमका काय उद्योग करायचा याचा तो रिसर्च करत होता. याच काळात त्याची ओळख पार्टनर आनंद नायक याच्याशी झाली. त्यांच्याकडे सुरुवातीला गुंतवणुकीसाठी फारसे पैसे नव्हते. कसंतरी करुन त्यांनी 3 लाखांची रक्कम उभी केली. या पैशांत कोणता व्यवसाय सुरु करता येईल, याची ते चाचपणी करीत होते. अखेरीस चहावर त्यांचा हा शोधाचा प्रवास थांबला. गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर त्यांनी चहाचं पहिलं आउटलेट सुरु केलं. गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर घुटमळणारे तरुण हे त्यांचं टार्गेट होतं. त्यासाठी पहिलं दुकान तिथंच उघडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
दुकानाचा बोर्ड करण्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची तयारी नव्हती. एका लाकडाच्या तुकड्यावर स्प्रेच्या माध्यमातून नाव लिहिण्यात आलं. नाव असं पाहिजे की वाचून एकदा तरी ग्राहकांनी यायला हवं, यासाठी ते जास्त आग्रही होते. दुकानाचं नाव चाय, सुट्टा बार असं ठेवण्यात आलं असलं, तरी ते सगळ्यांच्या तोंडात बसावं हा मार्केटिंगचा दृष्टीकोन त्यांच्याकडे होता. त्यांच्या दुकानांत सुट्टाही मिळत नाही आणि दारुही मिळत नाही.
प्रसिद्धीसाठी या दोघांनी वेगवेगळे प्रयोग केले. दुकानातील गर्दी दाखवण्यासाठी ते मित्रांना दुकानात बोलवत. दुसऱ्यांसमोर मोठमोठ्यानं बोलून चाय सुट्टा बारमध्ये गेला नाहीस का, असा प्रश्न विचारत, त्यातून अनेकांची उत्सुकता त्यांनी चाळवली. सुरुवातीला गर्दी दिसावी म्हणून खोटी गर्दीही त्यांनी जमा केलेी. हलहळू लोकांचा प्रतिसादही वाढू लागला. सहा महिन्यांत 2 राज्यातं 4 फ्रेंचाइिजी विकण्यात आल्या.
अनुभव आणि त्याच्या मित्राच्या या कंपनीनं आता मोठा विस्तार केलाय. देशआत 195 शहरांत 400 पेक्षा जास्त आऊटलेट उघडण्यात आले आहेत. देशाबाहेरही दुबी, युके, कॅनडा, ओमान सारख्या शहरातही चाय सुट्टा बार पोहचलं आहे. आज त्यांची कंपनी वर्षाला 150 कोटींचा चहा विकतेय. त्यांच्या मालकीच्या आऊटलेटमधील चहाचा टर्नओव्हर 30 कोटींचा आहे. येत्या काळात हा प्रवास आणखी विस्तारणार हे नक्की