
नवी दिल्ली : मंगळवारी नवी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या स्फोटानंतर (Blast at Israeli Embassy) इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने भारतातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी भारतातील त्यांच्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तपासादरम्यान घटनास्थळावरून एक पत्र सापडल्याचे वृत्त आहे, जे इस्रायलच्या राजदूतासाठी लिहिले होते.
[read_also content=”सालारपुढे डंकीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.25 कोटींची कमाई! https://www.navarashtra.com/movies/dunki-box-office-collection-day-6-is-1025-crore-nrps-492600.html”]
इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या स्फोटाचे वर्णन संभाव्य ‘हल्ला’ म्हणून केले आहे. भारतात राहणाऱ्या इस्रायली नागरिकांनी मॉल्स, मार्केट किंवा पाश्चात्य किंवा ज्यू लोक भेट देतात अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रेस्टॉरंट, हॉटेल आणि बारमध्ये इस्रायली नागरिकांनी सावध राहावे, असेही सांगण्यात आले आहे.
तसेच, नागरिकांना कोणत्याही प्रकारची इस्रायली चिन्हे लावणे टाळण्यास सांगितले आहे. त्यांना मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा इशारा दिला आहे. प्रवासाची माहिती सोशल मीडियावर देणे टाळण्यासही सांगण्यात आले आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात इस्त्रायली दूतावासाच्या मागे पृथ्वीराज रोडवर ‘अति तीव्रतेचा फटाका स्फोट’ झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी सांगितले की, लोकांनी मोठा आवाज ऐकला. ध्वजात गुंडाळलेले एक पत्रही सापडले आहे, ज्यामध्ये पॅलेस्टाईनमध्ये इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा उल्लेख करण्यात आला आहे.
या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. स्फोटानंतर सर्व राजनयिक सुरक्षित असल्याचे इस्रायली अधिकारी ओहद नकाश कायनार यांनी सांगितले असून इस्रायलचे सुरक्षा अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांसोबत तपास करत आहेत. विशेष बाब म्हणजे याआधी 2021 मध्येही इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट झाला होता, ज्यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले होते. 2012 मध्ये देखील एका वाहन चालकाने इस्रायली दूतावासाच्या गाडीवर बॉम्ब’ लावला होता, ज्यामुळे एक अधिकारी आणि चालक जखमी झाले होते.