कुलगाम चकमकीत २ जवान शहीद, एका दहशतवादीचाही खात्मा (फोटो सौजन्य-X)
Jammu and Kashmir News In Marathi: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल भागात गेल्या ९ दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या चकमकीत रात्रीच्या वेळी झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथील अखल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीचा आज (9 ऑगस्ट) नववा दिवस आहे. रात्रभर परिसरात मोठ्या स्फोटांचे आणि गोळीबाराचे आवाज येत होते. या दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोन लष्करी जवान शहीद झाले, तर इतर दोन सैनिक जखमी झाले. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यात सहभागी आहेत.
या जंगलात चार ते पाच अतिरेकी असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई सुरू केली तेव्हा ही चकमक सुरू झाली. सुरुवातीच्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही कारवाई सुरूच आहे.
गेल्या आठवड्यात, सुरक्षा दलांनी संशयित अतिरेक्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन तैनात केले आहेत तर लष्कराचे हेलिकॉप्टर कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी आकाशात घिरट्या घालत आहेत. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमितपणे या भागाला भेट देत आहेत. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी दहशतवादविरोधी कारवाईचा आढावा घेण्यासाठी नियमितपणे या भागाला भेट देत आहेत.
आर्मी नॉर्दर्न कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा काल दक्षिण काश्मीरच्या दौऱ्यावर होते जिथे त्यांना कारवाईची माहिती देण्यात आली. जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात आणि पोलिस महानिरीक्षक व्ही.के. बिर्डी यांनीही काल चकमकीच्या ठिकाणी भेट दिली.
या चकमकीत आतापर्यंत एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. तर एकूण दोन सैनिक शहीद झाले आहेत आणि दहा सैनिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घनदाट जंगले आणि नैसर्गिक गुहासारख्या लपण्याच्या ठिकाणांचा फायदा घेत किमान तीन किंवा त्याहून अधिक दहशतवादी अजूनही लपून बसले आहेत. ही चकमक गेल्या अनेक दशकांमधील सर्वात जास्त काळ चालणारी दहशतवादविरोधी कारवाई ठरली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांच्या शोधात भारतीय सुरक्षा दलांनी १ ऑगस्ट रोजी ‘ऑपरेशन अखल’ सुरू केले. या भागात दहशतवाद्यांची लपून बसल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. येथे २ ते ३ दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या मते, दक्षिण काश्मीरच्या जंगली भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या इनपुटच्या आधारे लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली.