
Jan Swaraj candidate Kamlesh Paswan receives milk abhishek and laddus in Nalanda Bihar Elections 2024
Bihar Elections 2024: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दोन टप्प्यामध्ये बिहारमध्ये मतदान पार पडणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून उमेदवारांनी पूर्ण ताकदीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. घोषणाबाजी, पोस्टरबाजी आणि आश्वासनांची खैरात वाटणे सुरु आहे. दरम्यान, नालंदा विधानसभा मतदारसंघातील आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. नालंदामध्ये उमेदवाराचे स्वागत एखाद्या राजाप्रमाणे केले आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला असून यामुळे राजा आहे की उमेदवार असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.
नालंदा जिल्ह्यातील चांडी ब्लॉकमधील दिहरा गावात जनसुराज पक्षाचे उमेदवार कमलेश पासवान यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात आणि अनोखे स्वागत केले. सोमवारी ते प्रचारासाठी गावोगाव फिरत होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत गावकऱ्यांनी केले. यामुळे संपूर्ण परिसरात आणि राजकीय वर्तुळात चर्चेला जोरदार उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दुग्धाभिषेक तर लाडुंनी तुळा
चांडी ब्लॉकमधील दिहरा गावात प्रचारासाठी आलेले जन सुराजचे हरनौत विधानसभेचे उमेदवार कमलेश पासवान यांचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांचा मोठा जमाव जमला होता. जोरदार उत्सवाचे वातावरण निर्माण करून प्रचारासाठी आलेल्या उमेदवाराचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी प्रथम त्यांना १०१ लिटर दुधाने आंघोळ घातली. त्यांचा दुग्धाभिषेक करत उमेदवार कमलेश पासवान यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या या दुग्धाभिषेकामुळे रस्त्यावर सर्वत्र दुध सांडले होते. त्यानंतर ७० किलो लाडूने उमेदवार कमलेश पासवान यांचे वजन करून त्यांचे स्वागत केले. लाडूने उमेदवार कमलेश पासवान यांची तुळा करण्यात आली.
विकास आणि पारदर्शक प्रशासनावर लक्ष केंद्रित करा
याप्रसंगी, ग्रामस्थांनी स्पष्ट केले की ते यावेळी विकास, शिक्षण, रोजगार आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर मतदान करतील. त्यांना आशा आहे की कमलेश पासवान सार्वजनिक मुद्द्यांवर एक मजबूत पर्याय ठरतील. ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केल्यानंतर त्यांनी उमेदवार कमलेश पासवान यांच्याकडून विकासाची देखील अपेक्षा व्यक्त केली आहे.
बिहार निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
जनसुराजचे ध्येय: जनतेला करायचे सक्षम
मंचावरुन उमेदवार कमलेश पासवान यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून आश्वासनांचा पाऊस पाडला. पासवान प्रचारदरम्यान, ग्रामस्थांनी दिलेल्या अनपेक्षित प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “जनसुराजचे ध्येय राजकारण लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. आमचे ध्येय केवळ निवडणुका जिंकणे नाही तर लोकांना सक्षम करणे आहे.” त्यांनी असेही सांगितले की त्यांचा पक्ष सार्वजनिक मुद्द्यांवर आपले राजकीय प्रयत्न केंद्रित करेल.असे आश्वासन उमेदवार कमलेश पासवान यांनी दिले आहे.
दिहरा आणि आसपासच्या गावांतील लोक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते. महिला, तरुण आणि वृद्धांच्या प्रचंड उपस्थितीवरून हे स्पष्ट होते की जनसुराज पक्षाची हरनौत विधानसभा मतदारसंघावरील पकड सातत्याने मजबूत होत आहे आणि कमलेश पासवान यांना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. या अनोख्या स्वागतामुळे आगामी निवडणुकांसाठी हरनौतमध्ये एका नवीन राजकीय दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.