'सर छत कोसळतंय!', मुलं सांगत असतानाही शिक्षकाचं दुर्लक्ष; झालावाड शाळा दुर्घटनेबाबत मोठा खुलासा, १० अधिकारी निलंबित
एकीकडे चांगलं शिक्षण आणि शाळेला शिक्षक मिळत नसताना शाळेच्या इमारतीही सुरक्षित नाहीत. अनेक स्वप्न उराशी बाळगून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवावर या इमारतीही उठल्या आहेत. कित्येक शाळा जीर्ण झाल्याच्या बातम्या येत असतात. पण ढिम्म प्रशासन केवल मलमपट्टी करून पळवाट काढतं आणि हिच मलमपट्टी विद्यार्थ्यांच्या जीवावर उठते. राजस्थानच्या झालावाड मधील शाळेच्या इमारतीने हे सिद्ध केलं आहे. छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा जीव घेल्यानंतर पाच शिक्षण आणि पाच शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पण गेलेलं मुलं परत येणार का असा सवाल पालकांमधून उपस्थित केला जात आहे.
‘मी चूक केली, ओबीसींना कधी समजून घेतलं नाही…’, जातनिहाय जनगणेवरून राहुल गांधी असं का म्हणाले?
राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावात शुक्रवारी सकाळी दुःखद घटना घडली. सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे छत कोसळून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी मुले प्रार्थना सभेसाठी शाळेत उपस्थित होती. या जीर्ण इमारतीबद्दल अनेक वेळा इशारा देण्यात आला होता. तरीही प्रशासन दुर्लक्ष करत राहिले आणि ज्याची भीती होती तेच घडलं. या प्रकरणात पाच शिक्षक आणि पाच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
गावकऱ्यांच्या मदतीने मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोक आणि विद्यार्थ्यांचे दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या भिंती आणि छत आधीच जीर्ण अवस्थेत होतं. काही काळापूर्वी प्लास्टरिंग करण्यात आले होतं, परंतु परिस्थितीत सुधारणा झाली नाही. या शाळेची इमारत ७८ वर्षे जुनी असल्याचंही समोर आलं आहे.
वर्षा नावाच्या विद्यार्थिनीने सांगितले की, छतावरून लहान दगड पडत होते. मुलांनी शिक्षकांना सांगितलं पण शिक्षणांनी त्यांना दरडावून जागेवर बसण्यास सांगितलं. त्यानंतर लगेचच छत कोसळलं आणि मुलं छताच्या मलब्यात दबली. दुर्घटना घडली तेव्हा शिक्षक जवळच नाश्ता करत होते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.
या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये संताप आहे. कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी सांगितले की, शाळेच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, परंतु कोणीही गांभीर्याने घेतलं नाही. अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत पाच शिक्षक आणि पाच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित केले. चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकारी अजय सिंह राठोड यांनी म्हटलं आहे.