हिसार: हरियाणातील युट्युबर आणि संशयित गुप्तहेर ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधीच ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानात १४ दिवस ती मुरिदके येथे वास्तव्यास होती आणि तिने तेथे खास जासूसीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ती भारतात परतली होती. भारतात परतल्यानंतर तिला एका ‘विशेष मिशन’वर काम करायचे होते. मात्र, याचदरम्यान पहलगाम हल्ला व ऑपरेशन ‘सिंदूर’ सुरू झाल्यामुळे तिचा मिशन काही काळासाठी थांबवावा लागला. तथापि, तिचे नेमके मिशन काय होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा तीन वेळा अधिकृतपणे पाकिस्तानला गेल्याची नोंद तिच्या पासपोर्टवर आहे. ती प्रत्येकवेळी करतारपूर साहिब मार्गे पाकिस्तानात गेली होती. पहिल्यांदा तिने स्वतः वीजा मिळवला होता, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या वेळी तिला पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश याने वीजा मिळवून दिला होता. पोलिसांचा संशय आहे की, ती आणखी दोन ते तीन वेळा पाकिस्तानात गेली असण्याची शक्यता असून त्या प्रवासाची नोंद तिच्या पासपोर्टवर नाही. त्यामुळे तिने अवैध मार्गाने सीमा पार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, कपिल जैन यांन राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) टॅग केले आणि ज्योती मल्होत्रावर लक्ष ठेवण्याची विनंती केली, तसेच तिच्या पाकिस्तान आणि काश्मीर दौऱ्यांमुळे होणारा धोक्यांकडेही लक्ष वेधले होते. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एनआयए कृपया या महिलेवर बारकाईने लक्ष ठेवा. ती प्रथम पाकिस्तानी दूतावासाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली आणि नंतर १० दिवसांसाठी पाकिस्तानलाही गेली. आता ती काश्मीरला जात आहे… या सगळ्यामागे काही धागेदोरे असू शकतात. असं कपिल जैन यांनी म्हटलं होतंय.
ज्योतीने तिसऱ्या दौऱ्यात थेट इस्लामाबाद गाठले आणि तेथून मुरिदके येथील एका गुप्त कॅम्पमध्ये १४ दिवसांचे विशेष प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण एका अत्यंत गोपनीय मिशनसाठी असल्याचे बोलले जात आहे. ती भारतात परतल्यानंतर लगेचच मिशनवर काम सुरू करणार होती, मात्र पहलगाम हल्ल्यामुळे मिशन काही काळ थांबवावे लागले. काही सूत्रांच्या मते, तिला हल्ल्याची माहिती आधीच होती, पण याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या मिशनमध्ये ज्योती एकटी नसून तिच्यासोबत भारतातील २४ पेक्षा अधिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व इन्फ्लुएन्सर्स लाखो फॉलोअर्स असलेल्या व्यक्ती आहेत. या माध्यमातून पाकिस्तान भारतात एका नव्या प्रकारचे “डिजिटल युद्ध” सुरू करणार होता. यामध्ये भारतीय जनतेच्या मनात पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे, तसेच आपल्या देशातील सरकारविरोधात मतप्रवाह तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. याशिवाय, भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणे हेही या मिशनचा एक भाग होता.
Raigadh Politics: स्नेहल जगतापांच्या अजित पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश..; पण नव्या वादाची ठिणगी
हिसारचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनीही रविवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, युद्ध फक्त सीमारेषांवरच नाही, तर शत्रू देशाच्या अंतर्गत भागातही लढले जाते. पाकिस्तानने सोशल मीडिया आणि डिजीटल माध्यमांतून भारतात अशा प्रकारच्या युद्धाचे नियोजन केले असून, ज्योती मल्होत्रा त्यात एक ‘मोहरा’ ठरली आहे.