स्नेहल जगतापांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
रायगड: राजकीय वर्तुळातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाडमधील चांदे मैदानावर पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता आहे. स्नेहल जगताप या पूर्वी ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जात होत्या. त्यांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश उद्धव ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे.
विशेष म्हणजे, स्नेहल जगताप या शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांच्या प्रमुख राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जातात. सध्या रायगडच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या पदावर दावा केल्याने दोन्ही गटांमध्ये वाद सुरू आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश आणखीच राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात अननस खाल्यामुळे शरीराच्या ‘या’ अवयवांना मिळते भरपूर पोषण, हृद्य राहील कायम निरोगी
या पार्श्वभूमीवर, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसने स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे येथील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रवेश सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले होते. महायुतीमधील अनेक दिग्गज पराभूत झाले होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केले आणि राज्यात स्पष्ट बहुमत मिळवले. महायुतीने तब्बल 232 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले.
World Baking Day : आज जगभरात साजरा केला जात आहे ‘World Baking Day’, जाणून घ्या याचा रंजक इतिहास
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. या गळतीचा सर्वाधिक फटका शिवसेना (ठाकरे गट) यांना बसलेला दिसतो. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशातच, आता स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
कोण आहेत स्नेहल जगताप?
स्नेहल माणिकराव जगताप या महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या आहेत. त्यांनी महाडच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला आणि या पक्षाकडून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. स्नेहल जगताप यांना 91,232 मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार भरत गोगावले यांनी 1,17,442 मतांसह विजय मिळवला. ही लढत 26,210 मतांच्या फरकाने निर्णायक ठरली.