'कन्नड ही तमिळमधून उदयाला आलेली भाषा, माफी मागणार नाही!'; कमल हासन आपल्या वक्तव्यावर ठाम
ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी कन्नड भाषेवर वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. कन्नड ही तमिळमधून उदयास आलेली भाषा आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर कर्नाटकमधून त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. माफी मागण्याची मागणी होत आहे. मात्र कमल हासन आपल्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागण्यास नकार दिला आहे.
“मी जे काही बोललो ते प्रेमातून आणि माझ्या ज्ञानाच्या आधारे बोललो. अनेक इतिहासकारांनी मला भाषेच्या इतिहासाची शिकवण दिली आहे. यामध्ये कुठलाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. भाषांच्या उगमासंदर्भातील विषय हे अत्यंत गुंतागुंतीचे असून त्यावर केवळ तज्ज्ञांनीच चर्चा करावी. “राजकारणी भाषेबद्दल बोलण्यास पात्र नसतात. त्यांना आवश्यक ती पात्रता नसते, त्यात मी देखील आलो. हे विषय इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ता आणि भाषातज्ज्ञांकडे सोडूया,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
तामिळनाडूतील राजकीय परंपरेचा उल्लेख करताना हसन म्हणाले की, तामिळनाडून एक असं राज्य आहे जिथे विविध पार्श्वभूमीचे लोक मुख्यमंत्री झाले आहेत. तामिळनाडूमध्ये मेनन, रेड्डी, तमिळ आणि कन्नडिगा अय्यंगारही मुख्यमंत्री झाले आहेत. ही आपल्या राज्याची समावेशकता दर्शवते.
दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी तसेच काही प्रोकन्नड संघटनांनी हसन यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हसन यांना उत्तर देताना म्हटले की, “कन्नड भाषेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. कमल हसन यांना त्याची माहिती नाही, हे दुर्दैवी आहे.”
भाजप नेते आर. अशोक यांनी हसन यांच्यावर टीका करत त्यांना “मानसिक रुग्ण” असे संबोधलं आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये लिहिले की, “दुसऱ्या भाषेचा अपमान करणं असभ्यपणाचं वर्तण आहे. विशेषतः कलाकारांनी सर्व भाषांचा सन्मान केला पाहिजे. विविध भाषांमध्ये अभिनय केलेल्या कमल हासन यांनी कन्नड अभिनेता शिवराजकुमार यांचा संदर्भ देत तामिळ भाषेची स्तुती करताना कन्नड भाषेचा अपमान केला, ही त्यांच्या अहंकाराची परिसीमा असल्याचं म्हटलं आहे
दरम्यान कमल हसन यांच्या विधानामुळे निर्माण झालेला वाद सध्या दक्षिण भारतातील भाषिक अस्मितेच्या चर्चेला नवसंजीवनी मिळाली आहे.