बंगळुरु : कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे बिगूल आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. कर्नाटकात ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून, 10 मेला मतदान होईल तर या निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर केला जाईल, अशी माहिती मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
First-time voters have increased from 2018-19 by 9.17 lakhs in Karnataka. All young voters who are turning 18 years of age by April 1, will be able to vote in Karnataka Assembly elections: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/fNlVxVcta6
— ANI (@ANI) March 29, 2023
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 20 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. कर्नाटकात निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ येत्या 24 मेला संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कर्नाटकात सध्या भाजपकडे 117, काँग्रेसकडे 69, जनता दल (एस) कडे 32 आणि इतरांकडे सहा जागा आहेत. कर्नाटकात एकूण 5,21,73,579 मतदार आहेत.
काँग्रेसकडून उमेदवार जाहीर
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 124 उमेदवारांची यादी जारी केली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात येणार आहे. ते वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे म्हटले जात आहे.
मतदारांची संख्या वाढली
2018 च्या तुलनेत पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 9.17 लाखांनी वाढली आहे. एक एप्रिलला 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याचेही आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.