Kerala court issues non-bailable warrants against Acharya Balakrishna and Baba Ramdev
केरळ : योग गुरु म्हणून बाबा रामदेव हे संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अनेकदा ते त्यांच्या पतंजली कंपनीवरील वाढत्या वादामुळे देखील चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा बाबा रामदेव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा बाबा रामदेव यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. केरळ न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. बाबा रामदेव यांच्याबरोबरच पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्धही वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पतंजलीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
केरळच्या पलक्कड जिल्हा न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या अनुपस्थितीमुळे हे वॉरंट जारी केले आहे. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात ते दोघेही सुनावणीवेळी हजर राहिले नाहीत. केरळ न्यायालयाने दोघांविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे या दोघांनाही येत्या १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहावे लागेल. यापूर्वी, १ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने या आरोपींविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते जेणेकरून ते न्यायालयाचा मान राखून कोर्टात हजर राहतील. मात्र बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं काय प्रकरण आहे?
मागील अनेक महिन्यांपासून पतंजलीच्या प्रोडक्टच्या जाहिरातींमुळे बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिव्य फार्मसीने प्रसारित केलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातीशी संबंधित हे प्रकरण आहे. यावर केरळ ड्रग्ज इन्स्पेक्टरने कारवाई केली आहे. दोघांविरुद्ध दिशाभूल करणारी जाहिरात, अवमान आणि ट्रेडमार्क उल्लंघन असे खटले आहेत. योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड या प्रकरणांमुळे अडचणीमध्ये आले असून यामुळे चर्चेत देखील आले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर
याआधी देखील पतंजली अडचणींमध्ये
या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलीला दिलासा दिला आहे. तथापि, न्यायालयाने त्याला इशारा दिला होता की जर त्याने पुन्हा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले तर त्यांना शिक्षा होऊ शकते. यापूर्वी पतंजली दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडची माफी स्वीकारली होती. या प्रकरणातील मानहानीचा खटला बंद करण्यात आला. पतंजलीच्या कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलीला ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर कोविड-१९ बरा करण्याचा दावा केल्याचा आणि आधुनिक औषधांना निरुपयोगी म्हणल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा रामदेव बाबा अडचणींमध्ये आले आहेत.