नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे (Essential Commodity) दर वाढताना दिसत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. त्यात आता व्यावसायिक सिलेंडरच्या (Commercial Gas) दरात 103 रुपयांची वाढ झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे.
तसेच कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 103.50 रुपयांनी वाढून 1943 रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर 1839.50 रुपये झाला होता. तर चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1898 रुपये होते.
घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ नाही
पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून 19 किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाला आहे. मात्र, 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.