भोपाळ : भोपाळमध्ये मोठी आगीची घटना घडली आहे. भोपाळच्या मंत्रालयातील इमारतीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालीत. मात्र या आगीमध्ये अनेक महत्त्वाची शासकीय कागदपत्रे जळाली आहेत. शासकीय इमारतीमध्ये आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली.
भोपाळच्या थेट मंत्रालयामध्ये आग लागल्यामुळे उपस्थित सर्व लोकांची एकच धावपळ झाली. सदर आग इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालीत. अग्निशमन दलाकडून आगिवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑफिसमध्ये असलेली कागदपत्रे, पुठ्ठे आणि लाकडी सामानाने या आगीत मोठा पेट घेतला आहे. त्यामुळे आगीने आणखी रौद्ररुप धारण केल्याचे दिसत आहे.
बाहेरून पाहिल्यास इमारतीमधून आगीचे लोट आकाशात हवेत दूरवर फेकले जात असल्याचं दिसत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणालाच काही दुखापत झालेली नाहीये. मंत्रालयाच्या इमारतीला एवढी भीषण आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मंत्रालयाला आग लागली तेव्हा पाच आणि सहा क्रमांकाच्या गेटसमोर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतीत धूर निघताना दिसला. आग लागल्याचं त्यांच्या आधी लक्षात आलं त्यानंतर सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली.