दुचाकी वाहनांनाही टोल भरावा लागणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
देशभरात १५ जुलैपासून दुचाकी वाहनांवर टोल लागू होणार असल्याची चर्चा होती. मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या अफवांचं खंडन केलं असून बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारचा कोणताही निर्णय प्रस्तावित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून, दुचाकी वाहनांना टोलपासून यापुढेही सूट मिळणार असल्याची खात्री दिली आहे.
अर्धा देश झालाय ‘या’ 7 सीटर कारचा ‘फॅन’, खरेदी करण्यासाठी लागतेय मोठी लाईन; मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट
गुरुवारी (२६ जून) गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “दुचाकी वाहनांवर टोल लावण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
📢 महत्वपूर्ण
कुछ मीडिया हाऊसेस द्वारा दो-पहिया (Two wheeler) वाहनों पर टोल टैक्स लगाए जाने की भ्रामक खबरें फैलाई जा रही है। ऐसा कोई निर्णय प्रस्तावित नहीं हैं। दो-पहिया वाहन के टोल पर पूरी तरह से छूट जारी रहेगी। बिना सच्चाई जाने भ्रामक खबरें फैलाकर सनसनी निर्माण करना स्वस्थ…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 26, 2025
प्रत्येक दुचाकी वाहन विक्रीच्या वेळी त्याचा एक निश्चित टोल आधीच आकारला जातो, त्यामुळे वाहनचालकांनी टोल प्लाझावर पुन्हा पैसे भरावे लागत नाहीत. सध्या केवळ चारचाकी व त्याहून मोठ्या वाहनांकरताच राष्ट्रीय महामार्गांवर टोल आकारला जातो.
दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नुकतीच एक नवी टोल योजना जाहीर केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून ‘फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास’ योजना सुरु होणार आहे. या योजनेअंतर्गत वाहनचालकांना एकाचवेळी ३,००० रुपये भरून वर्षभरात २०० वेळा प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. ही योजना फिलहाल केवळ नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) आणि नॅशनल एक्सप्रेसवे (NE) अंतर्गत येणाऱ्या टोल प्लाझांवरच लागू राहील. राज्य महामार्गांवरील टोल बूथवर मात्र हा पास स्वीकारला जाणार नाही.
या योजनेबाबत माहिती देताना गडकरी म्हणाले की, “६० किमी परिघात एकाहून अधिक टोल प्लाझा असण्यामुळे नागरिकांना अतिरिक्त खर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागतो. वार्षिक टोल पासमुळे ही समस्या दूर होईल आणि टोल देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि किफायतशीर होईल.”
यामुळे प्रतीक्षा वेळ कमी होईल, टोल प्लाझांवरील गर्दी नियंत्रणात येईल आणि वादही कमी होतील, असंही त्यांनी सांगितलं.एकूणच, दुचाकी वाहनांवर टोल लावण्याची कोणतीही योजना सध्या अस्तित्वात नसून, त्यांच्यासाठी सूट कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांपासून सावध राहून अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असं स्पष्ट संकेत गडकरींनी दिले आहेत.