PM Narendra Modi aggressive stand against additional tariffs for interests of farmers
नवी दिल्ली: भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी “नरेंद्र मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात गोंधळ उडाला आणि उपसभापतींनी ते विधान सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले.
प्रदीप पुरोहित यांनी सांगितले की, “गिरिजा बाबा नावाच्या एका संताने मला सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वजन्म छत्रपती शिवाजी महाराज म्हणून झाला होता. त्यामुळेच ते राष्ट्र उभारणीचे कार्य करत आहेत. या विधानावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांनी यावर टीका केली आहे.
भाजपा खासदार प्रदीप पुरोहित यांच्या वादग्रस्त विधानावर मोठा गदारोळ उडाला आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या या वक्तव्याची तीव्र टीका केली जात आहे.
काँग्रेसच्या खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “अखंड भारताचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचा आणि महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा भाजपकडून सुनियोजित कट रचला जात आहे. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मानद टोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरावर ठेवून मोठा अपमान केला आहे. आता या भाजप खासदाराने दिलेले हे घृणास्पद वक्तव्य ऐका. आम्ही शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा तीव्र निषेध करतो. भाजप ही शिवद्रोही आहे. आम्ही हा अपमान सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे.” या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे.
भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्या विधानाचा सोशल मीडिया वापरकर्त्यांकडूनही निषेध करत आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचे सोशल मीडिया युजर्स म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक होते, कोणत्याही पक्षाचे चिन्ह नव्हते.’ त्यांचे शौर्य, त्याग आणि विचारसरणी राजकारणाशी जोडल्याने त्यांची महानता मर्यादित होत नाही का? असा सवाल विचारला आहे.