नवी दिल्ली – महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ‘महाकाल लोक’च्या नवीन दर्शन संकुलाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्जैन येथे पोहोचले. ते प्रथम अहमदाबादहून विशेष विमानाने इंदूर आणि तेथून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने उज्जैनला पोहोचले. हेलिपॅडवरून पंतप्रधान मोदी थेट महाकाल मंदिरात पोहोचले. गर्भगृहात नंदीला नमस्कार करून महाकालाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या गर्भगृहात पूजेला सुरुवात झाली आहे.
मोदी उज्जैनमध्ये सुमारे 3 तास राहतील. सायंकाळी 6.30 वाजता उज्जैनमध्ये 200 संतांच्या उपस्थितीत ते ‘महाकाल लोक’चे उद्घाटन करतील. कार्यक्रमस्थळी वॉटर प्रूफ डोम बांधण्यात आला असून, तेथे 60 हजार लोक उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान क्षिप्रा नदीच्या काठावर हा कार्यक्रम दाखवण्यासाठी मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. येथे सुमारे एक लाख लोक जमण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम 40 देशांमध्ये थेट दाखवला जाईल.
वाराणसीतील काशी विश्वनाथानंतर देशातील दुसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराचे नवे रूप बहरले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह दोनशे संत महतांच्या आणि सुमारे 60 हजार लोकांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता ‘महाकाल लोक’ चे उद्घाटन करणार आहेत. महाकाल लोक प्रकल्प 856 कोटींचा निधी खर्चून दोन टप्प्यात विकसित करण्यात आले. 2.8 हेक्टरमध्ये पसरलेले महाकाल संकुल आता 47 हेक्टरचे होणार आहे. यात 946 मीटर लांबीचा कॉरिडॉर असणार आहे. ज्यामुळे भाविक थेट मंदिराच्या गर्भगृहात पोहोचणार आहेत.