चेन्नई विमानतळावर टळली मोठी दुर्घटना; थोडक्यात बचावले १८० प्रवासी, लँडिंगवेळी नक्की काय घडलं?
सिंगापूरहून आलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातील सुमारे १८० प्रवाशांचा बुधवारी सकाळी मोठा अपघात टळला. चेन्नई विमानतळावर लँडिंग करत असताना वैमानिकांनी शेवटच्या क्षणी लँडिंग थांबवत पुन्हा आकाशात झेप घेतली. विमान फक्त २०० फूट उंचीवर असताना ही निर्णय घेण्यात आला. नंतर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षितपणे लँडिंग करण्यात यश आलं.
विमान सकाळी १०:१५ वाजता लँड होणार होते. मात्र, लँडिंग करताना अस्थिर उतरणीचा मार्ग आणि अचानक वाऱ्याची दिशा बदलल्याने लँडिंग अपयशी ठरलं. विमानाला जवळपास ३० मिनिटे आकाशात प्रदक्षिणा घालावी लागली आणि नंतर दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग करण्यात आलं
विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून सांगितले की, “सुरक्षित लँडिंगसाठी नियंत्रित उतरणीचा वेग, योग्य गती आणि रनवेशी समांतर संरेखन आवश्यक असते. या प्रकरणात उतरणीचा कोन खूपच तीव्र होता आणि वाऱ्याची दिशा अचानक बदलली.”
या घटनेनंतर चेन्नई विमानतळावर लँडिंगदरम्यान होणाऱ्या त्रासाबाबत नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याआधी ऑक्टोबर २०२४ मध्ये जयपूरहून आलेल्या इंडिगो विमानाला अशाच कारणामुळे ‘टच अॅन्ड गो’ करावे लागले होते. मार्च २०२५ मध्ये मुंबईहून आलेल्या विमानाचे लँडिंगवेळी टेलला नुकसान झाले होते.