नितीश कुमार बनणार नवे उपराष्ट्रपती? भाजप नेत्याने नाव सूचवताच चर्चांना उधाण
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीचं कारण देत सोमवारी अचानक पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून आता चर्चा नितीश कुमार यांच्या नावाची आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारलेल्या धनखड यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता, मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या संवैधानिक पदासाठी नवीन नावाबाबत चर्चा सुरू झाली आहे. यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचंही नाव चर्चेत आहे.
विशेष म्हणजे नितीश कुमार यांना राष्ट्रपती बनवण्याची मागणीष जेडीयूने नाही तर मित्रपक्ष भाजपच्या आमदाराने केली आहे. भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “नितीश कुमार गेल्या २० वर्षांपासून बिहारमध्ये सेवा करत आहेत आणि त्यांना प्रचंड प्रशासकीय अनुभव आहे. आता केंद्र सरकारने त्यांच्यावर देशाच्या उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे. जर त्यांना उपराष्ट्रपती बनवलं तर यापेक्षा चांगले काय असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत सामील होतील याबाबत विचारले असता, बिहारचे मंत्री प्रेम कुमार म्हणाले, “हे केंद्र सरकार ठरवेल. जर बिहारमधील कोणी उपराष्ट्रपती झाले तर मला आनंद होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नितीश कुमार यांना व्हायचं होतं उपराष्ट्रपती?
उपराष्ट्रपती पदाच्या या चर्चेत २०२२ सालचे एक विधान पुन्हा चर्चेत आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी त्यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “नितीश कुमार यांना स्वतः उपराष्ट्रपती व्हायचं होतं. या संदर्भात अनेक जेडीयू नेत्यांनीही भाजपशी संपर्क साधला होता.
नितीश कुमार उपराष्ट्रपती होण्याची शक्यता किती आहे?
नितीश कुमार उपराष्ट्रपती होण्याची शक्यता सध्या तरी नाही. शिवाय नितीश कुमार किंवा जेडीयूकडून यावर अद्यापतरी कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. मात्र नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी त्यांचे वडील पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं म्हटलं आहे.राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएमपी) प्रमुख आणि एनडीएचे सहयोगी उपेंद्र कुशवाह यांनी उघडपणे, नितीश कुमार आता सरकार आणि पक्ष दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी लवकरच पक्षाध्यक्षपद सोपवावं, अन्यथा निवडणुकांवर परिणाम होईल, असं म्हटलं आहे.राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले, ” थकलेले मुख्यमंत्री आणि निवृत्त अधिकारी सरकार चालवत आहेत”, पटना एम्स-सारख्या आरोग्य संस्थांमध्ये उपचारांसाठी बेडची कमतरता देखील समोर आली आहे.
भारतात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक राष्ट्रपती निवडणुकीनंतरची सर्वात महत्त्वाची संवैधानिक प्रक्रिया आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य या पदासाठी एकत्रितपणे मतदान करतात. अशा परिस्थितीत, भाजप खरोखरच नितीश कुमार यांना या पदासाठी पाठिंबा देईल का? तेही बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तथापि, जर हा निर्णय घेतला गेला तर भाजप आणि जेडीयूमध्ये राजकीय संतुलन निर्माण करण्याची ही एक मोठी रणनीती देखील असू शकते. यामुळे बिहारची सत्ता भाजपला सोपवण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो आणि नितीश कुमारांसाठी ‘सन्मानजनक निरोप’ देखील दिला जाऊ शकतो. नितीश कुमार किंवा जेडीयूकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु भाजप आमदाराने स्वतः ज्या पद्धतीने हा प्रस्ताव मांडला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.