भुवनेश्वर : बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) गंजाम जिल्ह्यातील त्यांच्या पारंपरिक हिंजिली तसेच पश्चिमेकडील बोलंगीर जिल्ह्यातील कांताबंजी या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. ओडिशा विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री पटनायक यांनी बुधवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करताना ही घोषणा केली.
नवीन पटनायक यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही दोन जागांवर निवडणूक लढवली होती. पश्चिम ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील हिंजिली आणि बीजेपूर या दोन्ही जागांवर ते विजयी झाले होते. मात्र, नंतर त्यांनी बिजेपूरचा राजीनामा देऊन हिंजलीची जागा राखली. पटनायक यांनी जाहीर केलेल्या नऊ उमेदवारांच्या यादीत सहा महिला आणि चार दलबदलू उमेदवारांचा समावेश आहे.
चार आमदारांची तिकीट कापली
बिजदने चित्रकोंडामधून पूर्ण चंद्र बाका, कुचिंदा येथून किशोर चंद्र नाईक, अंगुलमधून रजनीकांत सिंग आणि निमापाडामधून समीर रंजन दाश यांच्यासह चार विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. पटनायक यांनी या विधानसभा निवडणुकीत बिजद उमेदवार म्हणून चार दलबदलूंना उभे केले. ज्यात देवगडमधून अरुंधती देवी, निमापाडामधून दिलीप कुमार नायक, कुचिदामधून राजेंद्र कुमार छत्रिया आणि चित्रकोंडामधून लक्ष्मीप्रिया नायक यांचा समावेश आहे.
बीजदच्या यादीत लक्ष्मीप्रिया नायक (चित्रकोंडा), बरसा सिंग बरिहा (पदमपूर), अरुंधती देवी (देवगड), संजुक्ता सिंग (अंगुल), सुलखांसा गीतांजली देवी (सामाखेमुंडी) आणि डॉ. इंदिरा नंदा (सामाखेमुंडी) या महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.