जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी ओमर अब्दुला विराजमान;
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानुसार, आता राज्यात ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने 48 जागा जिंकल्या. त्यानंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार, आता सरकार स्थापन झाले आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा शपथविधी सोहळा सुरू झाला.
2009 मध्ये ते जम्मू-काश्मीरचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनले आणि 2015 पर्यंत या पदावर होते. मतमोजणीदरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असतील असे सांगितले होते.
ओमर अब्दुल्ला संपूर्ण कार्यकाळासाठी मुख्यमंत्री
‘ओमर अब्दुल्ला संपूर्ण कार्यकाळासाठी मुख्यमंत्री असतील. पॉवर शेअरिंग हा मुद्दा नाही. आम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांचे आभारी आहोत. जनतेने आपला जनादेश दिला असून, 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे’, असे त्यांनी म्हटले होते.
काँग्रेस सरकारमध्ये सहभागी नाही
काँग्रेसच्या एकाही नेत्याने आज शपथ घेतली नाही. विधानसभा निवडणूक एकत्र लढलेल्या काँग्रेसने मंत्रिपरिषदेत दोन मंत्रिपदांची मागणी केली होती. मात्र, संख्याबळ कमी असल्याने त्यांना एकच मंत्रिपद देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पक्षनेतृत्वाने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.