Operation Blue Star:
Operation Blue Star: “ऑपरेशन ब्लू स्टार एक गंभीर चूक होती, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना त्यांच्या जीव गमावून त्याची किंमत चुकवावी लागली.” असे विधान माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी केलं आहे. ते हिमाचल प्रदेशातील कसौली येथे खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात बोलत होते. पण त्यांच्या या विधानाने काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
गेल्या सहा महिन्यांत ऑपरेशन ब्लू स्टारवर हे दुसरे मोठे विधान आहे. यापूर्वी, ४ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते १९८४ चे ऑपरेशन ब्लू स्टार ही एक चूक असल्याचे त्यांनी म्हटले होते. “१९८० च्या दशकात काँग्रेस पक्षाने केलेल्या कोणत्याही चुकांची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे,” असे ते म्हणाले.
चिदंबरम म्हणाले, “अमृतसरमधील सुवर्णमंदिरात लपलेल्या सर्व दहशतवाद्यांना पकडण्याचा आणि त्यांना हटवण्याचा दुसरा मार्ग असू शकला असता. पण ऑपरेशन ब्लू स्टार हा चुकीचा मार्ग होता. मी मान्य करतो की श्रीमती इंदिरा गांधी यांना त्या चुकीची किंमत स्वत:चा जीव गमावून चुकवावी लागली. पण ती चूक सैन्य, पोलिस, गुप्तचर आणि नागरी सेवेचा संयुक्त निर्णय होता. तुम्ही एकट्या श्रीमती गांधींना दोष देऊ शकत नाही.”
पी. चिदंबरम म्हणाले की, ‘मला कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याचा अनादर नाही, परंत ऑपरेशन ब्लू स्टार हा सुवर्ण मंदिर परत मिळवण्याचा योग्य मार्ग नव्हता. सुवर्ण मंदिर परत मिळवण्याच्या ऑपरेशनपासून सैन्याला दूर ठेवायला पाहिजे होते. इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये आपले प्राण गमावले असले तरी, तो सर्वांचा सामूहिक निर्णय होता. “कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याचा अनादर करायचा नाही, परंतु ऑपरेशन ब्लू स्टार हा सुवर्ण मंदिर परत मिळवण्याचा चुकीचा मार्ग होता. काही वर्षांनंतर, आम्ही सैन्याला बाहेर ठेवून सुवर्ण मंदिर परत मिळवण्याचा योग्य मार्ग दाखवला.” असंही त्यांनी नमुद केलं.
“पंजाबची खरी समस्या आर्थिक आहे, खलिस्तान आणि फुटीरतावादाचा राजकीय नारा जवळजवळ संपला आहे, असे त्यांनी त्यांच्या भेटींवरून ठामपणे सांगितले.”
ऑपरेशन ब्लू स्टार ही जून १९८४ मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिर संकुलात करण्यात आलेली एक लष्करी कारवाई होती. त्याचा उद्देश खलिस्तानी नेता जर्नेल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांना संपवणे होता, जे सशस्त्र शस्त्रांसह सुवर्ण मंदिरात लपून बसले होते आणि खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन देत होते. ही लष्करी कारवाई १ ते १० जून १९८४ दरम्यान झाली. त्याच वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी केली होती.