मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहार मंत्री विजय शाह यांनी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या विधानावर देशभरातून टीका तीव्र टीका होत असून, आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायमूर्ती अतुल श्रीधर यांच्या खंडपीठाने राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) यांना विजय शाह यांच्याविरुद्ध चार तासांच्या आत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी सकाळी होणार आहे. न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांना या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत.
विजय शाह यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असली, तरी त्यांच्यावरचा रोष अद्याप शांत झालेल नाही. काँग्रेसकडून या विधानाचा तीव्र निषेध केला जात आहे. काँग्रेस नेते जितू पटवारी आणि इतर कार्यकर्ते श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे.
NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलांचे वारे; अनेक पदाधिकारी बदलण्याची शक्यता
जितू पटवारी यांनी पोलिस अधिकाऱ्यांना विचारले, “तुम्हालाही या विधानामुळे वाईट वाटले का नाही? आम्ही सामान्य नागरिक म्हणून आलो आहोत. पोलीस स्वतःहून एफआयआर दाखल करू शकत नाहीत का?” अखेर तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. काँग्रेसने राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये उद्या यासंदर्भात तक्रारी दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री मोहन यादव यांनाही पत्र पाठवले आहे. विजय शाह यांनी भारतीय सैन्याचा अपमान केला असून, त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असा आरोपही काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांनी सांगितले की पक्ष नेतृत्व या प्रकरणात संवेदनशील आहे. विजय शाह यांना पक्षाकडून कठोर इशारा देण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केले की भाजप अशा विधानांना कोणतीही मान्यता देत नाही. “कर्नल सोफिया संपूर्ण देशाची कन्या आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची नोकरी जाणार? काय आहेत प्रोटोकॉल अन् जिन्हिवा करार?
विजय शाह यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात वादग्रस्त विधान करताना म्हटले की, “ज्यांनी आमच्या मुलींच्या मंगळसूत्रांवर (सिंदूर) हल्ला केला, आम्ही त्यांच्या बहिणींना पाठवून त्यांना मारहाण केली.” हे विधान करताच समाजमाध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले, “कर्नल सोफिया यांच्याबद्दल मला खऱ्या बहिणीपेक्षा अधिक आदर आहे. मी त्यांना सलाम करतो. जर माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दहा वेळा माफी मागण्यास तयार आहे.”