Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने शोध मोहीम तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेखचे नावही पुढे आले. पोलिस आसिफच्या घरी शोध मोहीम राबवण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्याचे घर एका स्फोटात उडून गेले. त्याच्या घरात संशयास्पद वस्तूही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य कारवाईत आहे. पोलिसही त्याला पाठिंबा देत आहेत. पोलिस त्राल येथील आसिफ शेखच्या घरी शोध मोहिमेसाठी गेले होते. यावेळी संशयास्पद वस्तू पाहिल्यानंतर धोक्याची भावना जाणवली. हे पाहून सुरक्षा दलाचे जवान ताबडतोब मागे हटले आणि त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले. घरात स्फोटक पदार्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचा गोळीबार
पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही सुरूच आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून नियंत्रण रेषेच्या काही भागात गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या हलला प्रतिहल्ल्यात कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. पण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्करही हाय अलर्टवर आहे.
‘गोळीबार सुरू होण्यापूर्वीच बाहेर पडलो म्हणून आम्ही वाचलो’; बचावलेल्या पर्यटकांची भावना
आदिल थोकरचा पाकिस्तानशी संबंध
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिजबेहराचा रहिवासी आदिल हुसेन थोकर ऊर्फ आदिल गुरी याने उर्दू भाषेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१८ मध्ये अटारी-वाघा सीमेवरून वैध कागदपत्रांसह पाकिस्तानमध्ये प्रवेश केला. तेथे त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेतले आणि शस्त्रास्त्रे चालविण्यापासून ते स्फोटके बनवण्यापर्यंतचे प्रशिक्षण घेतले. २०२४ मध्ये तो जम्मू-काश्मीरमध्ये परतला आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय झाला.
बॉम्ब आणि बुलडोझरने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर
पहलगाम येथील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने दहशतवादी व त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. अनंतनागमधील बिजबेहरा येथे आदिल थोकरच्या घरावर सुरक्षा दलांनी नियोजित स्फोट करून ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या कारवाईपूर्वी परिसर रिकामा करण्यात आला आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली.
त्याचप्रमाणे, त्राल येथील मंगनहामा गावात आसिफ शेख यांच्या घरावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना स्पष्ट इशारा असल्याचे म्हटले जात आहे.
सीमेवर कडक नजर
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल अलर्ट मोडवर आले आहे. नियंत्रण रेषेवर (LoC) गस्त वाढवण्यात आली आहे आणि गोपनीय माहितीनुसार, दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची योजना आखण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी तीन संशयित दहशतवाद्यांचे स्केच प्रसिद्ध केले आहेत. आदिल थोकर, हाशिम मूसा (पाकिस्तानी), आणि अली बही (पाकिस्तानी) – आणि प्रत्येकीवर २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, १,५०० हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपायांची घोषणा केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.