जम्मू-कश्मीर हल्ल्यापासून पाकिस्तानातही मोठी खळबळ माजली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये वेगाने घडामोडींना घडत असल्याचे दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानात घुसखोरी करणार, असा विश्वास पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनीही व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, हल्ल्याच्या काही तासांच्या आतच पाकिस्तानने भारतासाठी हवाई मार्गही बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही पाकिस्तानच्या मनातील दहशत अद्यापही कायम आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी भारतीय लष्कराकडून कधीही हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराकडून मिळाल्याचे म्हटलं आहे.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानात घुसण्याची तयार सुरू झाली आहे. त्यासाठी आम्ही अधिकची मदत पाठवत आहोत. अशा परिस्थितीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच आमच्या अस्तित्त्वाला थेट धोका असेल तरच आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू, असा धमकीवजा इशाराही आसिफ यांनी दिला आहे. दुसरीकडे, भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान आता आखाती देश, चीन, ब्रिटन, अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्रांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही आखाती देशांनी दोन्ही देशांशी चर्चा सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय हा युद्धाला आमंत्रण असल्याची कृती असल्याचेही ख्वाजा आसिफ यांनी उल्लेख केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफा आणि शस्त्रास्त्रे सज्ज करण्यात आल्या आहेत. त्यातच पाकिस्तानी लष्करानेही सीमेपलीकडून हालचाली वाढवल्यामुळे लष्कर आणि हवाई दलाला दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या तीनही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुंछ आणि काश्मीरच्या इतरही काही भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार अद्याप सुरूच असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानने आपल्या सीमावर्ती गावांमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगितले आहे. गेल्या 4 दिवसांपासून पाककडून सतत शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवण्यासाठी या सर्व हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. यासंबंधीचे वृत्त लोकमत वृत्तसंस्थेने दिले आहे.
Nagpur News : शॉर्टसर्किट होऊन दोन ट्रक जळाले; ट्रकमधील साहित्यही जळून खाक