भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला; हल्ल्याच्या भीतीने मुस्लिम देशांसमोर केली विनवणी
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. विशेष, हल्ल्यानतंरही पाकिस्तानने सीमेपलीकडून अनेकदा गोळीबार करत शस्त्रसंधी कायद्याचे उल्लंघन केलं आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यांच्या विधानामुळें पाकिस्तानातील केंद्रीय मंत्र्यांच्या गोटातही घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. अशातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील बिघडत्या संबंधांवर मोठे विधान केले आहे.
येत्या २-३ दिवसांत काहीतरी मोठ घडणार असल्याचे विधान ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तामध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी, ख्वाजा आसिफ यांनी, पाकिस्तान पूर्णपणे सतर्क आहे आणि “आपल्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण झाल्यास आम्ही थेट अण्वस्त्रांचा वापर करू, असा इशारा आसिफ यांनी दिला होता.
दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी युद्धाचे संकेत दिले आहेत. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले की, “येणारे काही दिवस खूप महत्वाचे असतील. भारतीय सैन्य लवकरच पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. पाकिस्तान देखील याबद्दल पूर्णपणे सतर्क आहे. चीन आणि सौदी अरेबियासह अनेक आखाती देश दोन्ही देशांमधील सुरू असलेला संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
ख्वाजा मुहम्मद आसिफ यांच्या या विधानावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. “जम्मू आणि काश्मीरमध्ये निष्पाप पर्यटकांना मारणाऱ्यांना नक्कीच शिक्षा होईल. असे त्यांनी म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणले आहेत, ज्यात सिंधू पाणी कराराचाही समावेश आहे. तथापि, पाकिस्तान या हल्ल्याची जबाबदारी सतत नाकारत आहे. त्याच क्रमाने, पाकिस्तानने शिमला करार रद्द केला आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले.