अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडलं
अमृतसर : भारतीय लष्कराने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत मोठी कारवाई केली. या एअर स्ट्राईकचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं ठेवण्यात आलं होतं. भारतीय हवाई दलातील पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले दहशतवादी नऊ तळांवर हवाई हल्ले केले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानी सैन्य पार हडबडून गेल्याचं दिसत आहे. त्यातच अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडण्यात आलं आहे.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर (ऑपरेशन सिंदूर) नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या जोरदार गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. भारतीय लष्कराच्या ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ने एक जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात 5 फील्ड रेजिमेंटचे लान्सनायक दिनेश कुमार हे शहीद झाले. त्यांचे बलिदान देश विसरणार नाही. त्यांना सलाम’, असे म्हटले आहे. त्यातच आता जेठुवाल गावाजवळील आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानी रॉकेट पाडण्यात आलं आहे.
दरम्यान, भारतानं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारलं आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या सैन्याला घरात घुसून मारलं. बलुचिस्तानच्या बोलन दर्रा भागात स्फोट घडवण्यात आला, ज्यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल स्कॉडनं हल्ला केला आहे.
भारतीय लष्कराकडून रॉकेटचे अवशेष ताब्यात
भारतीय सैन्याने रॉकेटचे अवशेष ताब्यात घेतलं आहे. बुधवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानचे रॉकेल पाडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, भारतीय वायुदलाला सरकारकडून खुली सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानी विमानं आकाशात दिसल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची मुभा सरकारकडून भारतीय वायुदलाला दिली आहे.