नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयामुळे भारतातून इतर देशांमध्ये जाणाऱ्या विमानांना पर्यायी, पण अधिक लांब मार्गांचा वापर करावा लागणार आहे. विशेषतः सौदी अरेबिया, युएई, ओमान आणि कतारसारख्या आखाती देशांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरला जाणारा मार्ग पाकिस्तानमार्गे छोटा आणि थेट होता. आता विमानांना वळसा घेऊन प्रवास करावा लागेल, ज्यामुळे इंधन खर्च, वेळ आणि कर्मचार्यांचे कामाचे तास वाढतील.
सौदी अरेबियाकडे जाणाऱ्या विमानांनी पूर्वी पाकिस्तानमार्गे थेट उड्डाण करणे शक्य होते. मात्र, आता हे विमान अरबी समुद्रमार्गे किंवा इराणमार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. जो मार्ग अधिक लांब आणि खर्चिक आहे. अफगाणिस्तानातील काबूलहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानांनाही आता पाकिस्तान टाळून इराण आणि अरबी समुद्रावरून प्रवास करावा लागेल.
या निर्णयाचा थेट परिणाम म्हणजे विमान कंपन्यांचे ऑपरेशनल खर्च वाढतील आणि त्याचा परिणाम तिकीट दरांवर होईल. प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागतील. याशिवाय, युरोपकडे जाणाऱ्या विमानांच्या मार्गातही सुमारे ९१३ किमीची वाढ होईल, ज्यामुळे प्रवासाचा कालावधी सरासरी दोन तासांनी वाढेल.
उत्तर भारतातील विमानांवर मोठा परिणाम
विशेषतः उत्तर भारतातील शहरांमधून – जसे की दिल्ली, जयपूर, लखनऊ, चंदीगड आणि अमृतसर – पश्चिमेकडील देशांकडे जाणाऱ्या उड्डाणांवर या निर्बंधाचा मोठा परिणाम होणार आहे. याठिकाणी उड्डाण करणाऱ्या विमानांना गुजरात किंवा महाराष्ट्रमार्गे वळसा घेऊन अरबी समुद्रावरून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवास वेळेत सुमारे ७० ते ८० मिनिटांची वाढ होईल.
फक्त भारतच नव्हे, तर पाकिस्तानचेही नुकसान
यापूर्वी २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने अशीच कारवाई केली होती. त्यावेळी भारतीय विमान कंपन्यांना सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. परंतु पाकिस्तानलाही सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. सध्या आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी हे आणखी एक आर्थिक आव्हान ठरू शकते.
Former ISRO Chief K. Kasthurirangan Passed Away: इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन
या विमान कंपन्यांना सर्वाधिक फटका
एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय लांब पल्ल्याच्या उड्डाणांवर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. कंपनीने काही पर्यायी मार्गांची आखणी केली असली, तरी इंधन व वेळेच्या वाढीचा परिणाम खर्चावर होणारच आहे. इंडिगो, स्पाइसजेट तसेच मध्य पूर्व आणि युरोपकडे जाणाऱ्या इतर खाजगी विमान कंपन्यांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे.