PM Narendra Modi Mann Ki Baat on the Indian Constitution and Mahakumbh Mela
दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांसमोर आपली मतं मांडत असतात. यंदाच्या वर्षातील अखेरच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील एकतेवर खास भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओच्या 500 हून अधिक केंद्रांद्वारे प्रसारित केले जाते. ‘मन की बात’ कार्यक्रम 22 भारतीय भाषा, 29 बोली आणि 11 परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो. यावेळी वर्षाअखेरच्या ‘मन की बात’मध्ये त्यांनी यंदा प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभचा त्यांनी आवर्जुन उल्लेख करुन एकतेचा संदेश दिला. तसेच महाकुंभचा उल्लेख ‘‘एकतेचा महाकुंभ” असा केला आहे.
महाकुंभाचे वैशिष्ट्य केले नमूद
पुढील वर्षी 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाकुंभला उपस्थित राहणाऱ्या लोकांची विविधता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात घेऊन ‘मन की बात’ केली आहे. यावेळी ते म्हणाले की, “विविधतेतील एकतेचे असे दुसरे उदाहरण नाही. महाकुंभाचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या विशालतेतच नाही तर विविधतेतही आहे. हा मोठा धार्मिक कार्यक्रम दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ आयोजित केला जाणार आहे. संगम काठावर सध्या जय्यत तयारी सुरू आहे. कुंभमध्ये सहभागी होताना समाजातील फूट आणि द्वेषाची भावना दूर करण्याची प्रतिज्ञा घेऊ. कुंभ कार्यक्रमात प्रथमच AI चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे. कुंभशी संबंधित सर्व प्रकारची माहिती AI चॅटबॉटद्वारे 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. कुठेही भेदभाव नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. त्यामुळेच आपला कुंभही एकतेचा महाकुंभ आहे. भाविकांना त्यांच्या मोबाईल फोनवर सरकार मान्यताप्राप्त टूर पॅकेज, निवास आणि होमस्टेची माहिती दिली जाईल.” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
अमृतमहोत्सव प्रजासत्ताक दिन
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आगामी प्रजासत्ताक दिन हा संविधानाच्या अंमलबजावणीचा 75 वा प्रजासत्ताक दिन असेल, ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. संविधान काळाच्या कसोटीवर उतरले आहे, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “हे आमचे मार्गदर्शक आहेत. केवळ संविधानामुळेच आपण आयुष्यात या टप्प्यावर पोहोचलो आहोत,” असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
संविधान आणि नागरिकांना जोडणारी वेबसाईट
‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “संविधानाची ही 75 वर्षांचा प्रवास एक मैलाचा दगड आहे. याचा सन्मान करण्यासाठी, एक राष्ट्रव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना राज्यघटनेची प्रस्तावना वाचण्यासाठी आणि त्यांचे व्हिडिओ शेअर करण्याचे मी आवाहन करतो. अशा मोहिमांमधून सामूहिक अभिमान आणि एकतेची भावना वाढवते. संविधानातील तरतुदी आणि भावनेशी लोकांना जोडण्यासाठी ‘Constitution75.com’ नावाची वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी अनेकदा केंद्र सरकारवर राज्यघटना कमकुवत केल्याचा आरोप केला आहे, ज्याचा सत्ताधारी पक्षाने ठामपणे विरोध केला आहे”
“संवैधानिक मूल्ये आणि भावना बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदींनी त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांचा वारंवार उल्लेख केला आहे आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस जेव्हा सत्तेत आहे तेव्हा असे केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने संविधानाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.