
हर्षवर्धन सपकाळ 'या' तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार
सपकाळ यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे.
मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.
PM मोदी अन् योगींनी माफी मागावी – नाना पटोले
राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा अपमान आहे. मोदी-योगी यांनी हिंदुंच्या अस्मितेवर घाला घातला आहे. विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा भाजपा, नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.