पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर; 34200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन केले जात आहे. त्यातच आज पंतप्रधान मोदी हे गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा गुजरात दौरा भावनगर येथे सुरू होणार असून, ते ‘समुद्रातून समृद्धी’ कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34200 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या कार्यक्रमात सागरी आणि बंदर क्षेत्रासाठी नवीन धोरणाची घोषणा देखील केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान मोदींचा दौरा सकाळी साडेदहा वाजता भावनगर येथे एका कार्यक्रमाने सुरू होईल, जिथे ते एका मोठ्या जनसभेला संबोधित करतील. त्यानंतर ते धोलेराचे हवाई सर्वेक्षण करतील आणि दुपारी दीड वाजता आढावा बैठक घेतील. त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान लोथल येथे बांधल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) च्या विकासकामांचा आढावा घेतील आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील.
दरम्यान, सुमारे 4500 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे कॉम्प्लेक्स 375 एकरमध्ये पसरलेले आहे. त्यात जगातील सर्वात उंच दीपगृह संग्रहालय (७७ मीटर), १४ गॅलरी, किनारी राज्य मंडप, चार थीम पार्क आणि एक तरंगते रेस्टॉरंट यांचा समावेश असणार आहे. यामध्ये १०० खोल्यांचे तंबू शहर आणि रिसॉर्ट, ई-कार सुविधा आणि ५०० इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगचा समावेश असेल.
गुजरातमध्ये 26354 कोटी रुपयांचे प्रकल्प
पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये ऊर्जा, आरोग्य, महामार्ग आणि शहरी वाहतुकीशी संबंधित २६,३५४ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये ऊर्जा क्षेत्रातील एचपीएलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिनल (चारा पोर्ट) चे उद्घाटन, गुजरात आयओसीएल रिफायनरीमधील नवीन प्रकल्प आणि पीएम-कुसुम योजनेअंतर्गत ४७५ मेगावॅट क्षमतेचा सौर फीडर यांचा समावेश आहे.
नवीन धोरण सुरू होणार
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान सागरी आणि बंदर क्षेत्राशी संबंधित एक नवीन धोरण देखील सुरू करतील. याव्यतिरिक्त, सरकार आणि खाजगी क्षेत्रामध्ये अनेक सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी केली जाईल. यामुळे या क्षेत्रात नवीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.
हेदेखील वाचा : PM Modi Wife Jashodaben: १,६८,००० रुपये पेन्शन! पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांना इतर कोणत्या सुविधा मिळतात?