पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मध्ये 'मेड इन इंडिया' ॲनिमेशनच्या यशाचा गौरव; म्हणाले
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या 150 वा भाग झाला. या 150 व्या भागात त्यांनी देशातील ‘मेड इन इंडिया’ ॲनिमेशनच्या यशाचा गौरव केला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात म्हटले की, भारत ॲनिमेशनच्या जगात एका नव्या क्रांतीच्या मार्गावर आहे. तसेच भारतीय गेमिंगचे क्षेत्रही वेगाने विस्तारत आहे. भारतीय गेमिंगचे क्षेत्र जगभरात लोकप्रिय होत आहे.
छोटा भीम, कृष्णा, आणि मोटू-पतलू यांसारख्या ॲनिमेशन पात्रांच्या लोकप्रियतेचा उल्लेख
तसेच ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी छोटा भीम, कृष्णा, हनुमान आणि मोटू-पतलू यांसारख्या ॲनिमेशन पात्रांच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला. याचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हे पात्र केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही मुलांना आकर्षित करत आहे. जगभरात आपल्या भारतीय ॲनिमेशन चाहते आहेत. त्यांनी देशवासियांना ॲनिमेशनच्या जगात भारताला जागतिक महासत्ता बनविण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे.
पुढील लोकप्रिय गेम तुमची निर्मिती असू द्या- पंतप्रधान मोदी
ऑल इंडिया रेडिओच्या या विशेष भागात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल पर्यटनाच्या वाढत्या लोकप्रियतेचाही उल्लेख केला आणि तरुणांना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचे आवाहन केले. ‘कोणास ठाऊक, जगातील पुढचे सुपरहिट ॲनिमेशन तुमच्या कॉम्प्युटरमधून बाहेर येऊ शकते! पुढील लोकप्रिय गेम तुमची निर्मिती असू द्या,” असे ते म्हणाले. 28 ऑक्टोबर रोजी जागतिक ॲनिमेशन दिनाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी भारताला ॲनिमेशनच्या जगात एक पॉवरहाऊस बनविण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी आत्मनिर्भर भारत मोहिमेचाही उल्लेख केला.
‘वोकल फॉर लोकल’ या मंत्रासह स्वावलंबी भारत मोहिमेला बळकट करण्याचे आवाहन
भारतीय प्रतिभा गेमिंगमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी स्पायडर-मॅन आणि ट्रान्सफॉर्मर्स सारख्या चित्रपटांमध्ये भारतीय ॲनिमेटर हरी नारायण राजीव यांच्या योगदानाबद्दल कौतुक केले. “आज ॲनिमेशन क्षेत्राने एका उद्योगाचे रूप धारण केले आहे जे इतर उद्योगांना बळ देत आहे,” असे त्यांनी सांगितले.
या 150 व्या भागात, पंतप्रधानांनी लडाखमधील हॅनले येथे आशियातील सर्वात मोठ्या ‘इमेजिंग टेलिस्कोप मेस’च्या उद्घाटनाचा उल्लेख केला आणि हे यश ‘मेड इन इंडिया’चे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांनी देशवासियांना स्वावलंबी भारताची शक्य तितकी उदाहरणे आणि प्रयत्नांची माहिती देण्याचे आवाहन केले आणि ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्रासह स्वावलंबी भारत मोहिमेला बळकट करण्याचे आवाहन केले.