दिल्ली : राष्ट्रपती भवन येथे एनडीए सरकारचा तिसरा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक केली. यावेळी पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान देण्यात आले आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळाले. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी भाजपचा पुण्याचा गड राखण्याचे काम केले. त्यांनी सार्थ करुन दाखवलेल्या या विश्वासानंतर केंद्राने देखील त्यांना मोठी संधी दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांना भाजची पश्चिम महाराष्ट्राची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. एकूण राज्यातील राजकीय गणिते लक्षात घेत भाजपने मंत्रीपदाचे वाटप केले आहे.
महापौर ते केंद्रात मंत्री
पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मुरलीधर मोहोळ यांनी कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. पक्ष संघटनेत वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यानंतर भाजपने त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. खासदारकीमध्ये बाजी मारल्यानंतर त्यांची वर्णी थेट मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये लागली आहे. मुरलीधर मोहोळ यांचे नाव मंत्री पदासाठी येताच पुण्यातील भाजप कार्यकर्ते आणि कोथरुडमधील कार्यालयाबाहेर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला