नवी दिल्ली – बुधवारी पंजाबमधील संगरूरमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्या मजुरांवर पोलिसांनी लाठीमार केला. आपल्या मागण्यांसाठी भारतीय खेत मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यासाठी आलेल्या लोकांना पाठलाग करून मारहाण करण्यात आली. यामध्ये अनेक मजूर जखमी झाले.
बुधवारी सकाळी संगरूरमधील बायपासवर संपूर्ण पंजाबमधील विविध कामगार संघटनांचे सदस्य एकत्र आल्याचे सांगण्यात येत आहे. येथून त्यांनी भारतीय खेत मजदूर युनियनच्या बॅनरखाली मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाकडे कूच केली. या निदर्शनाची हाक संघटनांनी अगोदरच दिली होती, त्यामुळे पोलिस प्रशासनाने सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
पंजाब सरकार आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात घोषणाबाजी करत पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या एक किलोमीटर आधी बॅरिकेडिंग करून रोखले. मजुरांनी बॅरिकेडिंग ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांशी बाचाबाची झाली. यानंतर पंजाब पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी, मजूर जखमी झाले.