"मग तुम्ही का...?" ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ
Operaion Sindoor/Rahul Gandhi: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सध्या ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान राहुल गांधी आणि राजनाथ सिंह यांच्यात ऑपरेशन सिंदूरवरून वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर माहिती दिली. तर विरोधकांकडून बोलताना राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. संसदेत नेमके काय घडले हे जाणून घेऊयात.
“आम्ही दशतवादाला मुळापासून संपवण्याचा निर्धार केला आहे. आम्ही राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. १०० पेक्षा जास्त दहशतवादी आणि हँडलर्स मारले गेले. भारत कोणत्याही अवस्त्र युद्धाच्या भीतीला भीक घालणार नाही. दहशतवादाचा बिमोड केला जाणारच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांना कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. हे घृणास्पद आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
संसदेत सीजफायरवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी आणि राजनाथ सिंह यांच्यात थोडासा वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय लष्कराने जेव्हा शत्रू राष्ट्राच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली तेव्हा, पाकिस्तानने हार स्वीकारली होती. त्यानंतर पाकिस्तानने सीजफायरची मागणी केली, असे राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले. यावर राहुल गांधी यांनी मग तुम्ही ऑपरेशन थांबवले का? असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाने विरोधकांनी संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
ऑपरेशन सिंदूर कोणत्या दबावाखाली थांबवण्यात आले असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. भारताचा हेतू युद्ध करणे हा नव्हता. तर दशतवादाचा वापर करणाऱ्या पाकिस्तनाला धडा शिकवणे हा होता. यासाठीच ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. वायुसेना, नौदल आणि लष्कराच्या हल्ल्यांने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. १० मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क करून भारताला लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली होती.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी टीआरएफच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. लोकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या मारण्यात आल्या होत्या. यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानची अनेक निर्णय घेत कोंडी केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये घुसून १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले. सिंधू नदीचे पाणी रोखले. आर्थिक कोंडी केली. सीमा बंद करण्यात आल्या. तसेच जगभरात देखील पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा निषेध भारताने केला. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला.