
नवी दिल्ली : देशभरातील रेल्वे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांचा हा संप अनिश्चित काळासाठी असणार आहे. याबाबतचा इशाराच रेल्वे कर्मचारी संघटनांनी दिला आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.
याबाबत ‘ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन’चे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले की, ‘हा संप केवळ निर्णायकच नाही तर ऐतिहासिक असेल. या संपात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोबतच राज्य सरकारी कर्मचारी सुद्धा सहभागी होणार आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
केंद्रातील 28 लाख कर्मचारी होणार संपात सहभागी
संपात देशभरातील रेल्वे आणि केंद्रीय असे 28 लाख कर्मचारी आणि राज्य सरकारमधील तीन कोटींहून अधिक कर्मचारी, शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत. दिल्लीत जॉईंट फोरम फॉर रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेन्शन स्कीमच्या बैठकीत या निर्णय घेण्यात आला आहे. 1974 पेक्षा मोठा हा रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप असेल.
1974 पेक्षा मोठा असेल रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप
1974 पेक्षा मोठा हा रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप असेल. 1974 मध्ये बोनसच्या संदर्भात रेल्वे कर्मचाऱ्यांनी 20 दिवसांचा संप केला होता. या संपात 17 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. या संपाचं नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस यांनी केलं होतं. जॉर्ज फर्नांडिस हे तत्कालीन इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष होते.