दिल्ली, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी; NCR च्या तापमानात झाली मोठी घट (File Photo)
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात वातावरण बदलताना दिसत आहे. गुरुवारी वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या मोठ्या भागांना कृषी नुकसानीचा फटका बसला आहे. धान्य बाजारांमध्ये बाहेर साठवलेले भात, बाजरी आणि मक्याचे पीक पाण्याने पूर्णपणे भिजल्याने नुकसान झाले.
हजारो एकर पिकलेली पिके शेतातच जमीनदोस्त झाली. ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ३.५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील भात, कापूस आणि उसाच्या पिकांचे नुकसान झाले. हवामान विभागाच्या मते, हिमालयातील सक्रिय पश्चिमी वाऱ्यांमुळे हवामानात बदल झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील सुमारे ८० प्रमुख धान्य बाजारांमध्ये बाहेर साठवलेल्या १० लाख टनांहून अधिक धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या हरियाणाच्या धान्य बाजारात अंदाजे ८.७२ लाख टन धानाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, हवामानातील बदलामुळे डोंगर बर्फाच्या पांढऱ्या चादरीत झाकले गेले आहेत. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी एक फुटापर्यंत हिमवृष्टी झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथे पावसासोबतच उंच डोंगरांवर हिमवृष्टी वाढली आहे. उत्तराखंडमध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथ, तसेच हेमकुंड साहिबच्या शिखरांवर जोरदार हिमवृष्टी झाली आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात 5 अंशांपर्यंत घट
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेल्या पावसामुळे तापमानात ५ अंशांपर्यंत घट झाली आहे. दिल्लीत सकाळी ११:३० ते दुपारी २:३० दरम्यान १५.९ मिमी पावसाची नोंद झाली. कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस होते, जे सरासरीपेक्षा ४.९ अंशांनी कमी होते, तर किमान तापमान २३.३ अंश सेल्सिअस होते, जे सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी होते.
मान्सूनचा शेवटचा पाऊस आहे का?
– नाही, हा मान्सून बदलाचा काळ आहे. नैऋत्य मान्सून आता माघारी जात आहे आणि ईशान्य मान्सून (Northeast Monsoon) दक्षिणेत सक्रिय होत आहे. म्हणून उत्तर भारतात थंडी सुरू होणार, तर दक्षिण भारतात ऑक्टोबर-डिसेंबरपर्यंत पाऊस चालेल.
महाराष्ट्रात पाऊस आहे का?
– कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वीजा, हलका पाऊस अपेक्षित. 16 ऑक्टो रोजी पुणे-सातारा भागात ढगाळ वातावरण असणार आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
– उत्तर भारतात उभ्या पिकांना गारपिटीचा धोका, त्यामुळे कापणी लवकर करा. दक्षिणेत भात, केळी पिकाला पाणी साचू न देणे. IMD बुलेटिन पाहूनच प्रवास करा.






