Rajnath Singh targets Donald Trump for imposing additional tariffs on India
Rajnath Singh Marathi News : भोपाळ : भारत आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढत आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. रशियासोबत करत असलेल्या तेलाच्या व्यापारामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाराज झाले आहेत.या रागातून दंड स्वरुपात अमेरिका अतिरिक्त कर लादत आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चौफेर टीका होत आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातून अमेरिकेला एक कडक संदेश दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की भारत हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे, परंतु काही लोकांना ते आवडत नाही. ते स्वतःला जगाचा मालक समजू लागले आहेत.
राजनाथ सिंह रविवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BMEL) रेल हब येथील रोलिंग स्टॉक फॅक्टरीच्या भूमिपूजनासाठी पोहोचले. या प्रकल्पात सुमारे १,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि येत्या दोन वर्षांत कारखान्याचे बांधकाम पूर्ण केले जाईल. रोलिंग स्टॉक फॅक्टरीत केवळ रेल्वे डबेच तयार केले जाणार नाहीत तर इतर रेल्वे उत्पादने देखील तयार केली जातील.
राजनाथ सिंह यांनी मोहन यादव यांचे केले कौतुक
संरक्षणमंत्री म्हणाले की, औद्योगिक विकास असो किंवा सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुनरुज्जीवन असो, जेव्हा त्याची कमान मोहनजींसारख्या कष्टाळू आणि समर्पित व्यक्तीच्या हातात असते, तेव्हा जास्त काही सांगण्याची गरज नाही. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीमुळे मी असे म्हणू शकतो की आता मध्य प्रदेश फक्त ‘मध्य प्रदेश’ नाही तर ‘आधुनिक प्रदेश’ झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पायाभरणी समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या प्रकल्पाचा परिणाम केवळ या क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर विकासाची लाट संपूर्ण मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागात पोहोचेल. संरक्षणमंत्र्यांनी असेही म्हटले की, बीईएमएलने बनवलेले वंदे भारत रेल कोच देशाच्या वाहतूक क्षेत्राला नवीन चालना देत आहेत.
मध्य प्रदेशातून अमेरिकेला कडक संदेश
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडक संदेश दिला. ते म्हणाले की, भारतातील लोक भारतात बनवत असलेली वस्तू दुसऱ्या देशात गेल्यास ती तिथे बनवलेल्या वस्तूंपेक्षा महाग करण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत, जेणेकरून जगातील लोक ती खरेदी करू शकणार नाहीत.आज भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्यामुळे एक दिवस भारत जगातील एक मोठी शक्ती बनेल. ते म्हणाले, तुम्हाला हे जाणून आनंद होईल की आता आपण २४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या संरक्षण वस्तू निर्यात करत आहोत. हे नवीन भारताचे नवीन संरक्षण क्षेत्र आहे आणि निर्यात सतत वाढत आहे, असे गौरवोद्गार संरक्षण मंत्र्यांनी भारताबाबत काढले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
‘धर्म विचारून मारले, कर्म पाहून उत्तर दिले
यादरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दलही भाष्य केले. त्यांनी समारंभात सांगितले की, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारले, परंतु भारताने त्यांचे कर्म पाहून उत्तर दिले, असा आक्रमक पवित्रा घेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले आहे.