मोठी बातमी ! एनडीएचा घटक असलेल्या 'या' पक्षाने सोडली साथ; म्हटले, 'एनडीएशी आमचा काहीही संबंध नाही'
पाटणा : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात काही पक्षांच्या पाठिंब्यावर भाजपप्रणित एनडीएचे सरकार सत्तेत आहे. असे असताना आता याच मोदी सरकारच्या सोबत असलेल्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (आरएलजेपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी एनडीएसोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या पक्षाचे आता एनडीएशी कोणतेही संबंध राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पारस यांनी नितीश सरकारवर हल्लाबोल केला आणि ते दलितविरोधी असल्याचे म्हटले. आरएलजेपीने पाटणा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. दिवंगत रामविलास पासवान यांना भारतरत्न देण्याची मागणीही पशुपती पारस यांनी केली. त्यांचा पक्ष 243 जागांवर सदस्यता मोहीम सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पारस यांनी भारताच्या एनडीए सरकार आणि बिहार सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, ‘ही सरकारे भ्रष्ट आणि दलितविरोधी आहेत. केंद्र सरकारने सभागृहात आंबेडकर साहेबांचा अपमान केला आहे’, असा आरोप त्यांनी केला.
पारस म्हणाले की, ‘मी हे जाहीर करण्यासाठी आलो होतो की, आतापासून आमचा एनडीएशी कोणताही संबंध नाही. आम्ही आमच्या पक्षाची सर्व 243 जागांवर तयारी करू आणि पक्षाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन संघटना मजबूत करतील. निवडणुकीच्या वेळी, जो त्यांचा आदर करेल त्याच्यासोबत मी जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय एकटा घेणार नाही, तर सर्व पक्षाचे नेते एकत्र बसून कोणासोबत युती करायची हे ठरवतील. सध्या पक्ष सर्व जागांसाठी स्वतंत्रपणे तयारी करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.