१. लोकसभेत आणि राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जात आहे.
२. काल राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांच्या दाव्यावरून आव्हान दिले होते.
३. ऑपरेशन सिंदूर कसे यशस्वी झाले याबाबत काल पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सविस्तर भाष्य केले.
नवी दिल्ली/Operation Sindoor in Rajysabha: लोकसभेनंतर आज राज्यसभेत देखील ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु आहे. यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरवर सभागृहाला माहिती दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कशा प्रकारे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी भारताने कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवले याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी जयराम रमेश यांना सुनावले.
राज्यसभेत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “जयराम रमेशजी नीट कान देऊन एका, २२ एप्रिल ते १६ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झालेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक आक्रमक निर्णय घेतले. धोरणात्मक निर्णय घेतले. सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला थेंब-थेंब पाण्यासाठी तड्फडवण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रोखण्यात आला. सीमा बंद करण्यात आल्या.”
पुढे बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, “पाकिस्तान दहशतवादाला समर्थन करणे पूर्णपणे थांबवत नाही, तोवर सिंधू नदीचे पाणी त्यांच्यासाठी बंदच असणार आहे. रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही. पाकिस्तानला आम्ही संपूर्ण जगासमोर उघडे पाडले आहे.” एस. जयशंकर बोलत असताना राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ सुरु केला.
एस. जयशंकर यांनी सांगितली कहाणी
संसदेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, ” २२ मे ते १७ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही फोन कॉल झालेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन आला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तान मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. ज्यावर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानने हल्ला केल्यास भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल असे सांगितले.”
“पाकिस्तानने ९ आणि १० मे रोजी केलेल्या हल्ले भारताने यशस्वीपणे परतवून लावले. पाकिस्तान सीजफायरसाठी तयार असल्याने अनेक देशानी १० मे रोजी फोन करून भारताला सांगितले. मात्र युद्धविरामाबाबत बोलायचे असल्यास भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधावा असे भारताने स्पष्ट केले. अमेरिकेसोबत झालेल्या संभाषणात व्यापारासंदर्भात कोणताही मुद्दा नव्हता, असे जयशंकर म्हणाले.