
अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्या शहरातील (Ayodhya City) प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरातील एका साधूचा गळा दाबून खून (Murder of Sadhu) करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी मंदिरातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला साधूचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
राम सहारे दास असं खून झालेल्या साधूचे नाव आहे. सहारे हे हनुमानगढीच्या बसंतीया पट्टीचे संत दुर्बल दास यांचे शिष्य होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस मंदिरात दाखल झाले व त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आंबेडकर नगरच्या भिटी येथील सुमारे 10 एकर जमिनीच्या मालकीवरून हा खून झाल्याचं बोललं जात आहे.
खुनामागे पूर्वनियोजत कट
सहारे यांचा खून कट करून केल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. ही घटना घडली त्यावेळी मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याचं आढळून आलंय. ही घटना घडल्यापासून मंदिर परिसरात राहणारा ऋषभ शुक्ला नामक तरुण बेपत्ता आहे. त्याच्यावर खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रवेशद्वाराजवळील खोलीत सहारेंचे वास्तव्य
सहारे हे हनुमानगढी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या खोलीत राहत होते. या खोलीतच त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मानेवर खोलवर जखमा आढळल्या आहेत. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमही या खुनाचा तपास करत आहे.
एका महिन्यात दुसरी घटना
एका महिन्यात दुसरी घटना हनुमानगढी मंदिरात साधूचा खून होण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच एका नागा साधूचा मंदिरात संशयास्पद मृत्यू झाला होता. ते प्रकरण आत्महत्येचे असल्याचं बोललं जात होते. आता खुनाचा प्रकार समोर आल्यानं सगळेच हादरून गेले आहेत. साधू व महंतांनी या घटनांविषयी चिंता व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.