लखनौ : मिर्झापूर (Mirzapur) येथील एका टीव्ही मेकॅनिकच्या (TV Mechanic) मुलीची नॅशनल डिफेंस अॅकॅडमीच्या (NDA) परीक्षेत निवड झाली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या १९ जागांपैकी फ्लाइंग विंगमध्ये तिला दुसरे स्थान मिळाले आहे. सानिया मिर्झा (Sania Mirza) आता लवकरच फायटर पायलट बनणार आहे. सानिया मिर्झा एनडीएमधून उत्तीर्ण होऊन देशातील पहिली मुस्लीम महिला फायटर पायलट (First Muslim Woman Fighter Pilot) बनणार आहे.
सानिया मिर्झा ही मिर्झापूरच्या देहात कोतवाली क्षेत्रातील जसोवरमध्ये राहाणाऱ्या एका टीव्ही मेकॅनिकची मुलगी आहे. तिच्या वडिलांचे नाव शाहिद अली असे आहे. सानियाने तिचे १० वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पंडित चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमधून पूर्ण केले आहे. ती इयत्ता १२ वीमध्ये देखील जिल्ह्यात पहिली आली होती.
सानियाने १० एप्रिल २०२२ रोजी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर नोव्हेंबरमध्ये जाहीर झालेल्या यादीतही तिचे नाव आहे. ती २७ डिसेंबर रोजी खडकवासला, पुणे येथील एनडीए अॅकॅडमीमध्ये सामील होणार आहे. सानियाने लहानपणापासूनच हवाई दलात भरती होण्याचे आणि फायटर पायलट बनण्याचे स्वप्न होते. बारावीच्या शिक्षणानंतर तिने यासाठी कोचिंगही केले. तिच्या या कामगिरीचा सर्वांना अभिमान वाटत आहे.