अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी अनेक घोषणा केल्या. सर्वात मोठी घोषणा म्हणजे १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. प्राप्तिकरात सूट देण्यासह इतरही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण अर्थसंकल्प सादर होत असताना सुरुवातीला उसळी घेतला शेअर बाजार शेवटी शेवटी कोसळला. योग्य अशी झेप घेता आली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला आहे.
जोरदार नफ्याच्या आशेने निर्देशांकाकडं डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांची काही प्रमाणात निराशा झाली. तसेच वैश्विक बाजारातही संमिश्र कल दिसून आला. बीसई मिडकॅप इन्डेक्स ०.४९ टक्क्यांनी घसरणीसह बंद पडले. तर स्मॅालकॅप इन्डेक्समध्ये ०.३८ टक्क्यांची वाढ दिसून आली. दिवसाखेरच्या व्यवहारानंतर कन्झ्युमर ड्युरेबल्स, रिअल इस्टेट आणि FMCG शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. तर दुसरीकडे कॅपिटल्स गुड्स, पीएसयू इन्डेक्स आणि पावर आदी शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरल्यांचं पहायला मिळालं.
अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ५.३९ अंक म्हणजेच ०.०१ टक्क्याच्या किरकोळ वाढीसह ७७,५०५.९६ अंकावर स्थिरावला. तर एनएसईचा ५० शेअर्स असलेला निर्देशांक, निफ्टी २६.२५ अंक म्हणजेच ०.११ टक्क्यांच्या पडझडीसह २३,४८२.१५ च्या पातळीवर बंद झाला.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये लिस्टेट कंपन्यांचा एकूण मार्केट कॅपिटलायजेशन आज घसरून ४२३. ७५ लाख कोटी रूपयांवर पोहोचले. जे काल म्हणजेच ३१ जानेवारी रोजी ४२४.०२ लाख कोटी रुपये होती. बीसईमध्ये आज लिस्टेट कंपन्याचे मार्केट कॅप आज सुमारे २७ हजार कोटी रूपयांनी कमी झाले. म्हणजेच गुंतवणूकदारांचे अंदाजे २७ हजार कोटी रुपये बुडाले.
विशेष म्हणजे, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-2026 सादर होत असतानाच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी कमालीची अस्थिरता अनुभवली. स्टॉक आणि कमोडिटी एक्स्चेंज, BSE, NSE आणि MCX यांनी शनिवारी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी बजेट 2025 च्या निमित्तानं एक विशेष ट्रेडिंग सेशन आयोजित केले होते.बीएसईचे बरेच शेअर वाढीसह बंद झाल्याचे चित्र आज दिसून आले. एकूण चार हजारांहून अधिक शेअरपैकी दोन हजारांहून अधिक शेअर तेजीसह बंद झाले. दुसरीकडे १८२१ शेअरमध्ये पडझड झाल्याचे पाहायला मिळाले. तर शंभरहून अधिक शेअर सपाट पातळीवर स्थिरावले.