पाकिस्तानमध्ये नक्की तेलाचे साठे आहेत का? पाकिस्तानसोबतच्या ट्रम्प यांच्या करारावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया म्हणाले...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो त्यामुळे खवळलेल्या ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्क आकारण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानसोबत तेल करार करून जगाला आश्चर्यचकित केलं आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शशी थरूर म्हणाले की, अमेरिका भारतावर किती कर लावेल हे पहावं लागेल. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल आम्हाला १०० टक्के दंड देखील आकारला जाऊ शकतो. ट्रम्प ज्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत. त्यावरून असं वाटतं की सौदेबाजीसाठी सगळा खटाटोप चालला आहे. परंतु जर इतका कर लावला गेला तर आपल्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
व्यापारासंदर्भात अमेरिकेशी चर्चा सुरू आहे. मात्र जर हा प्रश्न सुटला नाही तर त्याचा निर्यातीवर परिणाम होणार आहे.जीडीपी डळमळीत होईल. अमेरिकेच्या मागण्या पूर्णपणे अन्यायकारक आहेत. त्यामुळे भारतातील लाखो लोकांचे जीवनावर परिणार होणार आहे. अमेरिका आमच्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेला आमची निर्यात अंदाजे ९० अब्ज डॉलर्स आहे. जर त्यात मोठी कपात झाली तर ते आपलं मोठं नुकसान होईल.
अमेरिकेच्या मागण्या पूर्णपणे अवास्तव आहेत आणि आमच्या वाटाघाटी करणाऱ्यांना त्याचा विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपल्या देशातील सुमारे ७० कोटी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. केवळ अमेरिकेला खूश करण्यासाठी आपण त्यांचे जीवनमान धोक्यात घालू शकत नाही. अमेरिकेलाही आपल्या गरजा समजून घ्याव्या लागतील, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानसोबतच्या अमेरिकेच्या तेल करारावर थरूर म्हणाले की, मला वाटतं की ट्रम्प यांना पाकिस्तानातील तेलाबाबत भ्रम झाला आहे. ते पाकिस्तानमध्ये तेल शोधत आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. सध्या आपले लक्ष आपल्या देशाच्या हितावर असलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी प्रशासनाने पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. या कराराद्वारे दोन्ही देश इस्लामाबादच्या तेलसाठ्यांचा विकास करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.