Sonam Wangchuk Protest: सोनम वांगचूक यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यांच्याविरोधात अशा प्रकारचे षडयंत्र रचणे आणि आयएसआय शी संबंध असल्याचे आरोप करणे हे पूर्णपणे मुर्खपणाचे आहे.” अशा कठोर शब्दांत सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली वांगचूक यांनी पलटवार केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गीतांजली वांगचूक यांनी सोनम वांगचूक यांच्या अटकेवर निशाणा साधत, लडाखमधील गेल्या चार वर्षांच्या परिस्थितीकडेही लक्ष वेधले आहे.
लेह-लडाखमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली. त्यानंतर लडाखमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या चारपैकी दोघांचे अंत्यसंस्कार आज दुपारी लेहमध्ये कडक सुरक्षेत झाले. जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था असताना, रविवारी कर्फ्यूमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आली नाही. लेह जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
“सोनम वांगचूक यांना अटक होणार असल्याच्या अफवा सुरू होत्या, पण त्यांना खरचं अशी अटक होईल असे वाटले नव्हते. त्यांच्या अटकेची बातमी आमच्यासाठी शॉकप्रमाणे होती. सोनम वांगचूक यांच्यावर लावण्यात आलेले पाकिस्तान फंडिंगचे आरोप पूर्णपणे निराधार आहे. पाकिस्तानाच UN ने हवामान बदलाबाबत एक कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यासाठी मी देखील वांगचूक यांच्यासोबत गेले होते. पण अशा प्रकारचे षडयंत्र रचणे आणि आयएसआयशी संबंध असल्याचे आरोप करणे हे पूर्णपणे मुर्खपणाचे आहे.’ असं गीतांजली यांनी म्हटले आहे.
गीतांजली वांगचूक म्हणाल्या, ‘सर्वांना माहिती आहे, सोनम वांगचूक यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. या सर्व गोष्टींचा वापर त्यांच्या विरोधात केला जात आहे आणि हे सर्व जगाला माहिती आहे सोनम ६ व्या अनुसूचीसाठी लढत आहेत आणि सरकारला ते द्यायचे नाहीय. ते काही त्यांच्या मागण्यासाठी लढत नाहीयेत. सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती, त्यातच ६ व्या अनुसूचीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी ते लढत आहेत.
केंद्र सरकारनेच दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ते शांततेच्या मार्गाने मागणी करत होते. कारण हा सीमाभाग आहे, संवेदनशील भाग आहे. इथे आर्मीसोबतच जनतेची साथ असणेही महत्त्वाचे आहे. पण केंद्र सरकारने इथल्या लोकांना जी वचने दिली होती, ती पूर्ण न झाल्याने आता लोक नाराज होऊ लागले आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली जात आहे, ज्या पद्धतीने सीबीआय, आयटी रेड यांच्या माध्यमातून एक वेगळे चित्र तयार केले जात आहे, यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.’ असंही गीतांजली वांगचूक यांनी म्हटलं आहे.
आमच्यावर मनी लॉण्ड्रिंगची केस होऊच शकत नाही, कारण आमचे ९९ टक्के व्यवहार हे ऑनलाईन माध्यमांतून होतात. कॅश व्यवहार होतच नाही. आम्ही हयालमधून पैसे घेत नाही पण दरवर्षी आमच्याकडून होत असतील तर ५० लाख ते १ कोटींचा निधी आम्ही हयालला देत असतो. त्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार आहे. सोनम वांगचूक यांची प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांच्यावर हे आरोप केले जात आहेत. आम्हीही प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्यासाठी तयार आहोत.. पुराव्यांसह उत्तर देण्यासाठी तयार आहोत. आमच्या कोणत्याही कंपन्यांचे ताळेबंद अगदी योग्यरित्या फाईल केले जातात. त्यानंतरही काही समस्या असतील तर त्यांचीही उत्तरे देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही सर्व आरोप फेटाळून लावत आहोत. त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. त्यांची प्रतिमा खराब केली जात आहे.
सोनम वांगचूक यांनी भडकावू भाषणे दिली नाहीत, ते गेल्या चार वर्षांपासून शांततेत आंदोलन करत आहेत. पंतप्रधान असोत वा, इतर कोण ते खूप आदराने विनंती करत असतात. त्यांच्या तोंडातून कधीही भडकावू भाषणे दिली नाहीत. त्यांनी कधीही तरुणांना भडकावले नाही. उलट त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनांमुळे तरूण शांत होते, पण तरुणांचेही काही स्वत:च्या समस्या आहेत. त्या दिवशी तरूण त्यांच्या हिंसा करण्यासाठी गेले नव्हते. ते शांततापूर्ण आंदोलनासाठीच गेले होते. पण पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या, त्यामुळे तरूणांच्या भावनांचा उद्रेक झाला. पण सोनम वांगचूक तर दुसरीकडेच होते. मग आमचा प्रश्न आहे. तुम्हाला फायरिंगची ऑर्डर कोणी दिली. ते तरूण काही दहशतवादी नव्हते. असंही गीतांजली वांगचूक यांनी म्हटलं आहे.