झालावाडनंतर आणखी एक मोठी दुर्घटना, शाळेचं प्रवेशद्वार कोसळलं विद्यार्थ्यांवर
राजस्थानमधील झालावाडमध्ये विद्यार्थ्यांवर शाळेचं छत कोसळल्याची घटना ताजी असताना जैसलमेर जिल्ह्यातील हाबूर (पूनमनगर) गावातही आज मोठी दुर्घटना घडली. राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार विद्यार्थ्यांवर कोसळलं. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर एक शिक्षक गंभीर जकमी झाला आहे. अरबाज खान (वय ९) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. जखमी शिक्षकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळारून मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी सकाळी शाळा सुरू होत असताना घडली. विद्यार्थी गेटमधून शाळेत जात होते. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वाराचा अचनाक जोरात आवाज आला आणि काही अळण्याच्या आधी प्रवेशद्वार कोसळलं. अरबाज खान अचानक गेट जोरात आवाज करत खाली कोसळला आणि त्याखाली अरबाज दबला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेत एक शिक्षकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं मात्र अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या अरबाजच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी मृतदेहासह शाळेच्या गेटसमोरच ठिय्या मांडला. गेल्या अनेक महिन्यांपासून शाळेचं प्रवेशद्वार मोडकळीस आलं होतं. यासंदर्भात अनेकदा प्रशासनाला लेखी आणि तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यात एका निष्पाप मुलाचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
ही घटना राजस्थानमधील सरकारी शाळांतील सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करते. या घटनेच्या काहीच दिवसांपूर्वी, २५ जुलै रोजी झालावाड जिल्ह्यातील पीपलोदी गावातही असाच एक भीषण अपघात घडला होता. तेथे सरकारी शाळेच्या छताचा भाग कोसळून ७ मुलांचा मृत्यू झाला होता आणि २२ विद्यार्थी जखमी झाले होते. त्या घटनेनंतर शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
जैसलमेरमधील या अपघातानंतर ग्रामस्थांनी, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, आणि राज्यभरातील सरकारी शाळांच्या धोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.