झालवाडमध्ये शाळेवर काळाचा घाला; छत कोसळून ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ जखमी
Jhalawar School Roof collapsed: राजस्थानच्या झालावाडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे झालवाडमधील मनोहरठाणा परिसरातील पिपलोदी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीचे छत अचानक कोसळल्याची माहिती आहे. छत कोसळल्याने शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ढिगाऱ्याखाली गाडल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, १७ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. सध्या सर्व उच्च पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीने ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. जखमी मुलांना मनोहर ठाणे सीएससी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या प्रकरणी राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी वर्गात पन्नासहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. छत कोसळताच मोठा आवाज ऐकू आला आणि आरडाओरडा आणि ओरड ऐकू आली. लगेच गावकरी आणि शिक्षकांनी ढिगारा काढण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी जखमींना खाजगी वाहनांनी मनोहरठाणा सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अनेक मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. पण या घटनेनंतर शाळेची इमारत इतकी जीर्ण झाली असतानाही त्याकडे दुलर्क्ष का करण्यात आले, असे प्रश्न पालकांसह स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. जखमी विद्यार्थ्यांना चांगले उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
दरम्यान, शाळेचे छत कोसळल्यानंतरचे काही फोटोही समोर आले आहेत. यामध्ये शिक्षकांसह स्थानिक नागरिक ढिगारा उचलताना दिसत आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या एकूण मुलांची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण ढिगाऱ्याखाली सुमारे ५० मुले गाडली गेली असावीत, अशी शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली आहे. मुलांना अजूनही बाहेर काढले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या आहेत. सर्व कचरा जेसीबीने काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची एक पोस्टही शेअर केली आहे. त्यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत ट्विटर एक्सवर भावना व्यक्त केल्या आहेत. ” झालावाडमधील मनोहरथाना येथील सरकारी शाळेची इमारत कोसळल्याने अनेक मुले आणि शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. कमीत कमी जीवितहानी व्हावी आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.” असं त्यांनी म्हटलं आहे.