ओडिशा विधानसभेबाहेर राडा; विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर लोक उतरले रस्त्यावर, पोलिसांनी तातडीने...
भुवनेश्वर : ओडिशा विधानसभेबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर हजारो विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक लोक रत्यावर उतरले आहेत. त्यामुळे मोठा राडा झाल्याचे पाहिला मिळाले. यामध्ये संतप्त निदर्शकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला गेला.
बालासोरमधील फकीर मोहन (स्वायत्त) महाविद्यालयात लैंगिक छळानंतर स्वतःला पेटवून घेतलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर ही निदर्शने करण्यात आली. निदर्शकांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा समावेश होता. लैंगिक छळाचा आरोप असलेल्या प्राध्यापकाला कठोर शिक्षा व्हावी आणि महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
हेदेखील वाचा : BJP News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकणार नाही, काय आहे नेमकं कारण?
दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि पीडितेच्या कुटुंबाला 20 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, केवळ भरपाई देऊन न्याय मिळणार नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. आरोपींना अटक करण्यासोबतच कॉलेज प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
लैंगिक छळानंतर एका विद्यार्थिनीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात या विद्यार्थिनीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तिने तिच्या कॉलेजच्या एका वरिष्ठ प्राध्यापकावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सरकार न्याय देण्यास विलंब करत आहे आणि पीडितेकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप निदर्शकांनी केला. त्यांनी दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
बॅरिकेड्स ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न
निषेधस्थळावरून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, निदर्शक बॅरिकेड्स ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पोलिस त्यांना रोखण्यासाठी पाण्याच्या तोफांचा वापर करताना दिसत आहेत. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.