Supreme Court hearing on Mahakumbh Mela security
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी भरणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी नागा साधूंनी मोठी गर्दी केली आहे. देशासह जगभरामध्ये महाकुंभ मेळ्याची चर्चा आहे. कोट्यवधी लोक प्रयागराजमध्ये दाखल झाले असून येथे उत्तर प्रदेश सरकारने मेळा निर्विघ्न पार पडण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरी देखील मौनी अमावस्येच्या रात्री महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. यावरुन भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
महाकुंभात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सोमवारी (दि.03) सुनावणी करणार आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान 29 जानेवारी रोजी संगम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले. न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या 3 फेब्रुवारीच्या कारण यादीनुसार, सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांचे खंडपीठ वकील विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करणार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाकुंभच्या सुरक्षेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये चेंगराचेंगरीच्या घटना रोखण्याची आणि कलम 21 अंतर्गत समानता आणि जीवनाच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची विनंती करण्यात आली आहे. या याचिकेत केंद्र आणि सर्व राज्यांना पक्षकार करण्यात आले आहे. यामध्ये, महाकुंभात भाविकांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
राज्य सरकारला मार्गदर्शक तत्वे देण्याची विनंती
महाकुंभात चेंगराचेंगरीच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती करणारी ही याचिका भारतीय संविधानाच्या कलम 32 अंतर्गत दाखल करण्यात आली आहे, असे याचिकेत सांगण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला चेंगराचेंगरीच्या घटनेचा स्थिती अहवाल सादर करण्याचे आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत.
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर
चेंगराचेंगरीची चौकशी एसटीएफतर्फे सुरु
उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कार्य दलाने प्रयागराज महाकुंभात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास तीव्र केला आहे. यूपी एसटीएफचे पथक कटाच्या दृष्टिकोनातून याचा तपास करत आहेत. महाकुंभातील चेंगराचेंगरी ही एखाद्या कटाचा भाग होती का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यूपी एसटीएफने संगम नाक्याभोवती सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरच्या डेटाची तपासणी सुरू केली आहे. त्य़ामुळे चेंगराचेंगरी घटना ही घडली होती की घडवण्यात आली होती याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाकुंभ मेळा परिसरात बांधलेल्या कमांड अँड कंट्रोल रूमच्या सीसीटीव्ही फुटेजवरून फेस रेकग्निशन अॅपद्वारे संशयितांची ओळख पटवली जात आहे. कुंभमेळ्यामध्ये लागलेली आगीच्या घटनेची खालिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीबाबत देखील तपास केला जात आहे.